जेजुरी : सांसद आदर्शग्राम योजनेअंतर्गत पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन गावात पहिल्या टप्प्यात विविध विकासकामे हाती घेण्यात आली असून दहा बंधारे बांधले जाणार असल्याचे माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी सांगितले.पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन हे गाव खासदार शरद पवार यांनी दत्तक घेतले आहे. जवळार्जुन येथे शरद पवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ व विशेषग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पवार बोलत होते. या वेळी माजी आमदार अशोक टेकवडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष जालिंदर कामठे, पुणे जिल्हा परिषेदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, उद्योजक सतीश मगर, राष्ट्रवादीचे नेते विजय कोलते, दिलीप बारभाई, सुदाम इंगळे, प्रा. दिगंबर दुर्गाडे, शिवाजी पोमण, दत्ता चव्हाण, विराज काकडे, पंचायत समितीच्या सभापती अंजना भोर, कॉँग्रसचे नंदकुमार जगताप, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार संजय पाटील व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.पवार म्हणाले, की देशाच्या पंतप्रधानांनी ही योजना सुरू केली असली, तरी या योजनेसाठी केंद्र शासनाच्या कुठल्याही निधीची तरतूद नाही. खासदार निधी राज्य शासन, उद्योजक यांची मदत घेऊन दत्तक गावांचा विकास करावयाचा आहे. जवळार्जुन गावात कऱ्हा नदीवर पाच बंधारे बांधणे, कृषी विभागात तीन बंधारे, काळा ओढा व चोरवाडी येथे दोन बंधारे बांधणे, गावातील बेघर नागरिकांसाठी घरे बांधणे, खांबावर एलईडी स्ट्रीट लाईट व्यवस्था करणे, राणे वस्तीवर शाळेसाठी वर्ग खोल्या व संरक्षक भिंत बांधणे, महिलांसाठी स्वयंरोजगार केंद्रासाठी इमारत बांधणे, गावातील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करणे, वैयक्तिक शौचालये, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणे, शेती प्रशिक्षण केंद्र उभारणे, जिल्हा बँकेची शाखा सुरू करणे, ही कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामासाठी साडेसात कोटी रुपयांची गरज असून, पुणे शहरातील काही उद्योजकांकडून अडीच कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच, खासदार फंडातील अडीच कोटी, असे साडेसात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे पवार यांनी सांगितले.माजी आमदार अशोक टेकवडे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नामुळेच पवारसाहेबांनी गाव दत्तक घेतले आहे, ग्रामस्थ त्यांचे आभारी आहेत, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र देवकर यांनी केले. (वार्ताहर)
जवळार्जुनला १० बंधारे बांधणार
By admin | Updated: April 25, 2016 01:19 IST