महाळुंगे : चाकण-तळेगाव दाभाडे रस्त्यावरील व औद्योगिकनगरी असलेल्या महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांची यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. देवाचा अभिषेक, काकडा आरती, पालखी मिरवणूक, महापूजा व पारंपरिक पद्धतीने काढण्यात आलेल्या प्रदक्षिणा मिरवणुकीने या उत्सवाची उत्साहात सांगता झाली.प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही महाळुंगे येथे श्री भैरवनाथ महाराजांच्या उत्सवाचे आयोजन ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. अखिल ग्रामदैवत जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष राजेंद्र भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र मिंडे, सदस्य राजेंद्र तुपे, शंकर महाळुंगकर, जयराम भांगरे, अशोक जाधव, माणिकराव पायगुडे, कांताराम तुपे, सुभाष बोऱ्हाडे, राजेंद्र महाळुंगकर, बाळासाहेब महाळुंगकर, बाळासाहेब भोसले, कैलास पवार, सरपंच कल्पना कांबळे, उपसरपंच किरण शिवळे, कृतिका वाळके, माजी उपसरपंच सुनील मिंडे, जयसिंग तुपे, सर्व सदस्य तसेच रोहिदास तुपे, शिवाजीराव वर्पे, युवा उद्योजक विनोद महाळुंगकर, ग्रामविकास अधिकारी पांडुरंग वणवे, गुरुदास तुपे, भाऊसाहेब तुपे आदींनी यात्रेचे उत्कृष्ट संयोजन व आयोजन केले होते. उत्सवाच्या दिवशी पहाटे पाच वाजता मंदिरात काकडा आरती, देवाचा अभिषेक, पूजन तसेच पुष्पहार अर्पण केल्यानंतर देवाची महापूजा, महाआरती, होमहवन करण्यात आले. सकाळी दहानंतर मांडव डहाळे व श्रींची वाद्यवृंदाच्या गजरात पारंपरिक पद्धतीने जंगी मिरवणूक काढण्यात आली. (वार्ताहर)
महाळुंगेत भैरवनाथ यात्रा उत्साहात
By admin | Updated: April 25, 2017 03:55 IST