पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी आणि मानापमान नाट्य, अंतर्गत धुसफूस होण्याचे प्रकार नवे नाहीत. शुक्रवारी सायंकाळी खराळवाडी, पिंपरी येथील पक्ष कार्यालयात एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने ‘आमचं-तुमचं’ केल्याने महापौर शकुंतला धराडे संतापल्या. ‘मी राष्ट्रवादीची आहे. तुम्हीच बोलणे योग्य नाही, तुम्ही लोकच मला दूर करतात. राष्ट्रवादीचीच असेल, असे महापौरांनी सुनावले. त्यानंतर संबंधित व्यक्तीने दिलगिरी व्यक्त केल्यानंतर यावर पडदा पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर गटबाजी आहे. ही गटबाजी विविध समित्यांची निवड, कार्यक्रमातही दिसून येत असते. त्यामुळे मानापमानाचे नाट्य नेहमीच रंगत असते. एका गटाचे कार्यकर्ते दुसऱ्या गटाच्या कार्यकर्त्यांची खेचाखेची करण्याची संधी सोडत नसतात. त्यामुळे शाब्दिक बाचाबाची होण्याचे प्रकार नेहमीच घडत असतात. विद्यमान महापौर धराडे यांच्यावर आमदार लक्ष्मण जगताप गटाचा शिक्का आहे. जगताप भाजपात गेले असले, तरी महापौर या राष्ट्रवादीतच आहे. मात्र, त्यांना या शिक्क्यामुळे अनेक वेळा मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. त्यांना वारंवार मी राष्ट्रवादीचीच आहे, हे सांगावे लागत आहे. असाच प्रकार आज घडला. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी सुजाता पालांडे यांची निवड झाली. त्याबद्दल खराळवाडीतील पक्ष कार्यालयात पालांडे यांचा सत्कार झाला. सायंकाळी साडेपाचला झालेल्या कार्यक्रमास महापौर धराडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, नगरसेविक मंदाकिनी ठाकरे, अमिना पानसरे, अरुण बोऱ्हाडे आदी उपस्थित होते. महापौर कार्यक्रमस्थळी आल्या असताना पक्षातील एका नगरसेविकेचे पतिराज महापौरांना ‘आमचा पक्ष-तुमचा पक्ष’ असे सहजपणे म्हणाले. ‘आमचं-तुमचं’ केल्याने महापौर भावूक झाल्या. आत्मसन्मान दुखावला गेल्याने संतप्तही झाल्या. त्या म्हणाल्या, ‘‘मला राष्ट्रवादी काँग्रेसने मोठे केले आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसची महापौर आहे. मी राष्ट्रवादीचीच आहे; असेल. आपल्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तीने आमचं-तुमचं करू नये. असे बोलणे योग्य नाही.’’ महापौर संतापल्याचे लक्षात आल्यानंतर त्या ज्येष्ठ कार्यकर्त्याने दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर महापौरांचा राग शांत झाला. हा सर्व प्रकार घडूनही राग व्यक्त न करता महापौर पूर्णवेळ कार्यक्रमास उपस्थित होत्या.(प्रतिनिधी)संबंधित व्यक्ती भावनेच्या भरात बोलून गेली. त्यांना चूक लक्षात आल्यानंतर दिलगिरी व्यक्त केली. संबंधित व्यक्ती ज्येष्ठ असल्याने मीही अनावधानाने झालेली त्यांची चूक माफ केली. - शकुंतला धराडे, महापौर
...अन् महापौर संतापल्या
By admin | Updated: January 30, 2016 04:04 IST