Kachchatheevu: कच्चातिवू बेटावर पुन्हा कब्जा करून भारताच्या मच्छिमारांची समस्या दूर होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 10:21 PM2024-04-01T22:21:55+5:302024-04-01T22:25:42+5:30

भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये असलेल्या कच्चातिवू बेटावरून दक्षिणेत राजकारण तापलं आहे. या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला लक्ष्य करत तत्कालीन सरकारच्या या निर्णयावर भारतीयांमध्ये नाराजी असून काँग्रेसवर विश्वास ठेवता येणार नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याचं म्हटलं आहे.

तामिळनाडूचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी आरटीआय दाखल केला होता. त्याला उत्तर देताना असं समोर आलं आहे की १९७४ मध्ये तत्कालीन इंदिरा गांधी सरकार आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती श्रीमावो बंदरनायके यांच्यात एक करार झाला होता. या कराराअंतर्गत भारताने श्रीलंकेला कच्चातिवू बेट सुपूर्द केले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केले आणि राजकारणात पुन्हा नवा वाद उफाळून आला. तर या करारामुळे श्रीलंकेतून ६ लाख तामिळींना पुन्हा भारतात आणले गेले असा दावा काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे.

कच्चातिवू बेट तामिळनाडूच्या रामेश्वरमपासून २५ किमी उत्तर पश्चिमेकडील एक बेट आहे. १९७४ मध्ये करारानुसार हे बेट श्रीलंकेकडे गेले. या करारानंतर दोन्ही देशांची समुद्री सीमा निश्चित करण्यात आली होती. सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यात कुठलाही सीमावाद नाही. परंतु तरीही हे बेट दोन्ही देशांमधील वादाचा मुद्दा आहे.

कच्चातिवू बेट बंगालच्या खाडीला अरबी समुद्राशी जोडते. जवळपास २८५ एकर ही जमीन आहे. जर या भागाची तुलना करायची झाली तर दिल्लीच्या जेएनयू कॅम्पसच्या ३ पटीने जास्त जागा आहे. तर लाल किल्ला याहून काहीसा छोटा असेल. सॅटेलाईट कॅमेऱ्याने पाहिले तर हे बेट निर्जनस्थळ आहे. त्याठिकाणी हेलिपॅडसारखं काहीतरी बनवलं आहे. त्यासोबत बेटावर एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत जोडणारे रस्ते दिसतात. काही इमारती आहेत ज्याचा उपयोग श्रीलंकन नौदल करते.

स्थानिक माध्यमांनुसार, श्रीलंकेने सुरक्षेच्या दृष्टीने कच्चातिवू बेटावर एक नौदलाची तुकडी तैनात केली आहे. ही तुकडी न केवळ समुद्री किनाऱ्याचे रक्षण करते तर येथील सेंट एंटनी चर्चही सुरक्षा नौदलाकडे आहे. याठिकाणी येणाऱ्या लोकांनी पोस्ट केलेल्या फोटोंमुळे श्रीलंकन नौदलाची जहाजे दिसतात.

श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयानुसार, जवळपास ४५०० लोकसंख्या असलेल्या डेल्फ्ट बेटावर २००२ मध्ये नौदल स्टेशन बनवण्यात आलं होते. तिथून कच्चातिवू आणि त्याच्या आसपासच्या बेटांवर श्रीलंकेचे लष्कर पेट्रोलिंग करताना आढळते. कच्चातिवू बेट आंतरराष्ट्रीय समुद्री सीमा रेषेजवळ आहे. याठिकाणी भारतीय मच्छिमारांना मासे सुकवणे आणि सेंट एंटनी चर्चमध्ये होणाऱ्या वार्षिक धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची परवानगी आहे. परंतु मासे पकडण्यास सक्त मनाई आहे.

१९७४ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात करार झाला होता. या करारानुसार, दोन्ही देशांमध्ये समुद्री सीमा निश्चित करण्यात आली. परंतु यावरून अद्यापही गोंधळ आहे. कराराच्या अनुच्छेद ५ मध्ये म्हटलंय की, भारतीय मच्छिमार आणि तिर्थक्षेत्री येणारे पर्यटक विना कुठल्याही परवान्याने कच्चातिवू बेटावर ये-जा करू शकतात. तर अनुच्छेद ६ नुसार, दोन्ही देशांचे जहाज एकमेकांच्या समुद्री सीमेत येऊ जाऊ शकतात

१९७६ साली दोन्ही देशात पुन्हा एक करार करण्यात आला. त्यानुसार आंतरराष्ट्रीय सीमा मन्नारची खाडी आणि बंगालच्या खाडीपर्यंत वाढवण्यात आली. गेल्या अनेक वर्षापासून भारतीय मच्छिमार हे कच्चातिवू बेट आणि त्याच्या आसपास मासेमारी करतात

सध्या भारत आणि श्रीलंका यांच्या वादाचा मुद्दा म्हणजे मासेमारी, भारतीय समुदाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात मासे नाहीत. त्यामुळे बेटाच्या आसपास मासेमारी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडावी लागते. जी ओलांडल्यानंतर श्रीलंका नौदल मच्छिमारांना ताब्यात घेते. त्यामुळे हा एक वाद बनला आहे.