Indian Navy Ensign: मोदींनी शिवरायांना समर्पित केलेल्या नौदलाच्या नव्या ध्वजाचं महत्व समजून घ्या, नेमकं काय बदललं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 12:16 IST
1 / 9पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज कोचीच्या शिपयार्डमध्ये भारताच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी आयएनएस विक्रांत ही स्वदेशी युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली. आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाची शान ठरणार आहेच, पण त्यासोबतच मोदींनी आज भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचंही अनावरण केलं. भारतीय नौदलाचा नवा ध्वज ८ वर्षांनी बदलण्यात आला आहे. 2 / 9भारतीय नौदलाच्या ध्वजामध्ये याआधी लाल रंगाचं एक क्रॉस मार्क होतं. जे इंग्रजांचं प्रतिक होतं. आता ते हटवण्यात आलं आहे. गुलामीचं निशाण खाली उतरवून आज भारतीय नौदलाला नवा ध्वज मिळाला आहे, असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. नौदलाचा नवा ध्वज भारतीय नौदलासाठी नवा अध्याय ठरेल असंही ते म्हणाले. नव्या ध्वजातून क्रॉस ऑफ सेंट जॉर्ज हटवण्यात आलं आहे. 3 / 9नौदलाच्या पांढऱ्या रंगाच्या ध्वजाच्या मधोमध लाल रंगाची एक आडवी आणि उभी रेष होती. याच लाल रंगाच्या रेषेला क्रॉस ऑफ सेंट जॉर्ज असं म्हटलं जातं. या क्रॉसच्या मधोमध अशोक चिन्हं होतं. तसंच वरील बाजूच्या डाव्या रकान्यात तिरंगा होता. गेल्या ८ वर्षांपासून भारतीय नौदलाचा हाच ध्वज होता. त्याआधीही नौदलाचे वेगवेगळे ध्वज राहिले आहेत.4 / 9स्वातंत्र्यानंतर जेव्हा भारताची फाळणी झाली. त्यावेळी नौदलाचे देखील दोन भाग झाले. एक होता रॉयल इंडियन नेव्ही, तर दुसरा रॉयल पाकिस्तान नेव्हा असा होता. २६ जानेवारी १९५० रोजी भारत जेव्हा प्रजासत्ताक देश बनला तेव्हा यातून रॉयल शब्दप्रयोग काढून टाकण्यात आला आणि नवं नाव भारतीय नौदल म्हणजेच इंडियन नेव्ही असं निश्चित झालं. नाव बदललं गेलं तरी नौदलाच्या ध्वजात मात्र काही बदल झाला नव्हता. ध्वजावर इंग्रजांची आठवण कायम होती. भारतीय नौदलाच्या ध्वजावर लाल रंगाचा जो क्रॉस मार्क दिसतो त्यास सेंट जॉर्ज क्रॉस असं म्हटलं जातं. हा ध्वज आधी इंग्रज ध्वज युनियन जॅकचा एक भाग होता. 5 / 9तेव्हापासून लाल रंगाचा क्रॉस भारतीय नौदलाच्या ध्वजावर कायम राहिला आहे. २००१ साली ध्वज बदलण्यात आला आणि रेड क्रॉस हटविण्यात आला. त्याजागी नीळ्या रंगाचं अशोक चिन्हं देण्यात आलं. त्यावर आक्षेप नोंदवण्यात आला. निळा रंग समुद्र आणि आकाशाशी जुळतो त्यामुळे समुद्रात दूरवरुन ध्वज ओळखू येत नाही. त्यामुळे २००४ साली भारतीय नौदलाच्या ध्वजात पुन्हा बदल करण्यात आला. 6 / 9२००४ साली भारतीय नौदलाच्या ध्वजात पुन्हा रेड क्रॉस देण्यात आला. पण यावेळी रेड क्रॉसच्या मधोमध अशोक चिन्ह देण्यात आलं. २०१४ साली यात पुन्हा बदल करण्यात आला आणि अशोक चिन्हाच्या खाली सत्यमेव जयते असं लिहिण्यात आलं.7 / 9पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर लाल क्रॉस हे 'सेंट जॉर्ज क्रॉस' म्हणून ओळखले जाते. हे नाव एका ख्रिश्चन योद्धा संताच्या नावावरून ठेवण्यात आले. असं म्हटलं जातं की जेव्हा तिसरं धर्मयुद्ध झालं तेव्हा सेंट जॉर्ज एका योध्याच्या भूमिकेत होते. हाच क्रॉस इंग्लंडच्या राष्ट्रध्वजावर देखील पाहायला मिळतो. ११९० साली इंग्लंड आणि लंडन सिटीनं या ध्वजाचा स्वीकार केला. जेणेकरुन इंग्रजांच्या जहाजांची ओळख सहजपणे पटवता येऊ शकेल. 8 / 9ब्रिटीश नौदलात आजही या रेड क्रॉसचा वापर करण्यात येतो. १७०७ साली इंग्लंडने स्वीकारलेला ध्वज आजही कायम आहे. भारतीय नौदलाच्या ध्वजावरही आजवर इंग्रजांची ही निशाण कायम होती. आज ती निशाण हद्दपार करण्यात आली.9 / 9भारतीय नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाजारांना अर्पण करत असल्याचं मोदींनी आज म्हटलं. नव्या निशाणात डाव्या बाजूस तिरंगा आणि उजव्या बाजूस निळ्या रंगाच्या बॅकग्राऊंडवर सोनेरी रंगात अशोक चिन्ह साकारण्यात आलेलं आहे. त्याखाली संस्कृत भाषेत 'शं नो वरुण:' असं लिहीण्यात आलं आहे.