तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 13:54 IST
1 / 9काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी उघडकीस आणलेला मतदार याद्यांमधील घोळ आणि बिहारमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राबवण्यात येत असलेली मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाची प्रक्रिया सच्या चर्चेचा विषय ठरली आहे. यादरम्यान, अनेक मतदारांच्या नावावर दोन दोन मतदार कार्ड असल्याची माहितीही समोर येत आहे. त्यामध्ये बिहारचे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा आणि आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांचाही समावेश आहे.2 / 9या प्रकरणी निवडणूक आयोगाकडून पुढील कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, हे प्रकरण सर्वसामान्य नारगिक आणि मतदारांसाठीही एक धडा आहे. जर तुमच्याकडेही दोन मतदार कार्ड असतील तर त्याची माहिती निवडणूक आयोगाला देणं आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. आज आम्ही तुम्हाला तुमच्या नावावर दोन मतदार कार्ड असतील, तर त्यांचा शोध कसा घ्यायचा आणि त्यापैकी एक कार्ड जमा कसं करायचं याच्या प्रक्रियेची माहिती देणार आहोत. 3 / 9नियमानुसार एका व्यक्तीकडे एकच मतदार कार्ड असणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे दोन मतदार कार्ड असतील तर तो ग्नुहा आहे. त्यामुळे मतदारांनी त्यांच्याकडील डुप्लिकेट मतदार कार्डची स्वत: ओळख पटवून ते रद्द करावे,असं आवाहन निवडणूक आयोगाकडून वारंवार करण्यात येतं. असं करणं ही कायदेशीर जबाबदारी तर आहेच सोबतच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी तसं करणं आवश्यक आहे. 4 / 9आपल्या नावावर एकापेक्षा अधिक मतदार कार्ड आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी निवडणूक आयोगाचं संकेतस्थळ किंवा मोबाईल अॅपचा वापर करा. त्यात तुम्ही तुमचं नाव, वडिलांचं नाव, जन्मतारीख इत्यादी माहिती टाकून मतदार कार्डाचं स्टेटस तपासू शकता. जर तुमच्याकडे एकापेक्षा अधिक मतदार कार्ड असतील तर वेबसाईटवर तुम्हाला तुमची माहिती अनेकदा दिसेल. 5 / 9त्यासाठी तुम्हाला निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जावं लागेल. तिथे तुम्ही Search Electoral Roll हा पर्याय निवडा. त्यानंतर तुम्ही तुमचं नाव, पत्ता आणि इतर माहिती टाकून शोध घेऊ शकता. जर तुमच्या नावावर दोन मतदार कार्ड असतील तर तुमच्या दोन्ही मतदार कार्डची माहिती तिथे दिसेल. त्याशिवाय तुम्ही वोटर हेल्पलाईन अॅप डाऊनलोड करून तिथे माहिती टाकल्यावर तुम्हाला तुमच्या नावावर किती मतदार कार्ड आहेत याची माहिती मिळू शकते. 6 / 9जर तुमच्याकडे इंटरनेटची सुविधा नसेल तर तुम्ही तुमच्या भागातील बूथ लेव्हल ऑफिसरशी संपर्क साधू शकता. बीएलओकडे आपल्या क्षेत्रातील सर्व मतदारांची यादी असते. तसेच ते तुमच्या नावावर किती मतदार कार्ड आहेत हे सांगू शकता. 7 / 9 जर तुमच्या नावावर दोन मतदार कार्ड असल्याचं समजलं तर घाबरू नका. तुम्ही त्वरित फॉर्म-७ भरून एक मतदार कार्ड रद्द करू शकता. हा फॉर्म ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने भरता येऊ शकतो. त्यासाठी तुम्ही निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन फॉर्म-७ डाऊनलोड करू शकता. किंवा बीएलओशी संपर्क साधू शकता. 8 / 9वेळीच आपलं डुप्लिकेट मतदार कार्ड ओळखून रद्द करणं आवश्यक असतं. असं न केल्यास निवडणूक आयोगाकडून विचारण्यात येणाऱ्या कारणांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. तसेच कायदेशीर कारवाईचीही टांगती तलवार असेल. 9 / 9लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५० मधील कलम १७ आणि १८ नुसार एका व्यक्तीने एकापेक्षा अधिक मतदार ओळखपत्रं बाळगणं हे बेकायदेशीर आहे. असे केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. तसेच दंडात्मक कारवाई किंवा तुरुंगवासही होऊ शकतो.