मुंबई, दि. 25 - घाटकोपरच्या दामोदर पार्क येथे श्रेयस सिनेमागृहाजवळची साई दर्शन ही चार मजली इमारत मंगळवारी सकाळी कोसळली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये एक पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे. या इमारतीत 15 खोल्या होत्या तसेच इमारतीच्या तळमजल्यावर सितप नर्सिंग होम हे रुग्णालय होते. सुरुवातीला 8 ते 10 जण ढिगा-याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण ताज्या माहितीनुसार ढिगा-याखाली 35 ते 40 जण अडकले असण्याची शक्यता आहे. इमारतीच्या तळमजल्यावर सितप नर्सिंग होम हे रुग्णालय होते. तिथे काही रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आतापर्यंत 15 जणांना ढिगा-याखालून बाहेर काढण्यात आले असून, त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे. एकूण 9 जखमींमध्ये चार पुरुष आणि पाच महिला आहेत. पोलीस, पालिका प्रशासनाचे अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. स्थानिक रहिवाशी सुद्धा बचावकार्यात प्रशासनाला मदत करत आहेत. ही जुनी जर्जर इमारत होती असे तिथे रहाणा-या स्थानिकांनी सांगितले. साई दर्शन इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर तीन खोल्या होत्या. तळ मजल्यावरील सितप नर्सिंग होममध्ये दुरुस्तीचे काम सुरु होते. इमारत कोसळण्याआधी आग लागून धुर आला व नंतर इमारत कोसळली अशी माहिती स्थानिक नागरीकांनी दिली. शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक सुरेश पाटील यांनी ही इमारत तीस ते चाळीसवर्ष जुनी असल्याचा अंदाज व्यक्त केला तसेच पालिकेकडून या इमारतीला नोटीस बजावण्यात आल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. दुर्घटनास्थळी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते दाखल झाले असून, मदतकार्यामध्ये गुंतले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 14 गाडया, 108 अॅम्ब्युलन्स तैनात करण्यात आल्या आहेत. दरवर्षी पालिकेकडून पावसाळयात धोकादायक इमारतींना नोटीस बजावली जाते. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतही एक धोकादायक इमारत कोसळली होती. सुदैवाने त्यावेळी कोणतीही जिवीतहानी झाली नव्हती. दरवर्षी पावसाळयात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात जुन्या जर्जर इमारती कोसळण्याच्या दुर्घटना घडत असतात. त्यात अनेक नागरीकांना प्राणास मुकावे लागते. इमारती रिकामी करण्यासाठी पालिकेकडून नोटीस बजावली जाते पण कोणतीही पर्याय व्यवस्था केली जात नसल्याने रहिवाशी आपला जीव मुठीत घालून त्या धोकादायक इमारतीमध्ये रहातात.