चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची आवडती कार, मोदींनीही केली सफर! 'लाल झेंडा' असलेल्या 'या' गाडीत खास काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 15:21 IST
1 / 8पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चीनच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत, जिथे ते शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेत सहभागी झाले आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदींच्या प्रवासासाठी चीनने आपली सर्वात खास आणि आलिशान कार 'होंगकी एल ५' (Hongqi L5) उपलब्ध करून दिली आहे. या कारमधून प्रवास करतानाचे मोदींचे फोटो सध्या जगभर चर्चेचा विषय बनले आहेत.2 / 8चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग स्वतः याच कारचा वापर करतात, यावरून या कारचे महत्त्व लक्षात येते. विशेष म्हणजे, २०१९ मध्ये शी जिनपिंग भारताच्या महाबलीपुरम दौऱ्यावर आले असताना त्यांनी याच कारमधून प्रवास केला होता. आता मोदी चीनमध्ये पोहोचल्यावर त्यांना हीच खास गाडी दिली गेल्याने, ही एक मोठी डिप्लोमॅटिक ट्रीट मानली जात आहे.3 / 8चिनी भाषेत 'होंगकी'चा अर्थ 'लाल झेंडा' असा होतो. ही गाडी १९५८मध्ये चीनच्या सरकारी कंपनी 'फर्स्ट ऑटोमोबाइल वर्क्स'ने खास कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांसाठी तयार केली होती. ही कार 'मेड इन चायना'चे प्रतीक मानली जाते.4 / 8आज 'होंगकी एल५' हे त्याचे सर्वात प्रतिष्ठित मॉडेल आहे. याची ओळख चीनची 'रोल्स रॉयस' म्हणून आहे. ही कार सुरक्षिततेच्या बाबतीतही अद्वितीय आहे. या कारमध्ये ६.०-लिटर व्ही१२ टर्बो इंजिन आहे, जे ४०० हॉर्सपॉवरपेक्षा जास्त ताकद निर्माण करते. अवघ्या ८.५ सेकंदांत ही कार १०० किमी प्रतितास वेगापर्यंत पोहोचू शकते.5 / 8'होंगकी एल५' ही कार पूर्णपणे बुलेटप्रूफ आहे. यामध्ये ३६०-डिग्री कॅमेरे, पार्किंग सेन्सर्स आणि ऑल-व्हील ड्राइव्ह सारख्या अत्याधुनिक सुरक्षा सुविधा आहेत. आतून ही कार एखाद्या राजवाड्याप्रमाणे सजली आहे. यामध्ये उत्तम प्रतीच्या लेदर सीट्स, लाकडी फिनिशिंग आणि मौल्यवान 'जेड' दगडाचे नक्षीकाम आहे.6 / 8या कारची किंमत ५ ते ७ कोटी रुपयांच्या दरम्यान आहे, ज्यामुळे ती चीनमधील सर्वात महागड्या आणि सुरक्षित गाड्यांपैकी एक आहे.7 / 8१९५८ या गाडीचे 'CA72' नावाचे पहिले मॉडेल लॉन्च झाले. १९७०मध्ये माओ जेदोंग यांनीही या कारचा वापर केला. १९९५-२००६ या काळात कंपनीने ऑडी आणि लिंकनच्या गाड्यांच्या री-ब्रँडेड व्हर्जन बाजारात आणल्या. २०१८ नंतर होंगकीला 'मेड इन चायना लक्झरी' ब्रँड म्हणून नव्याने ओळख मिळाली.8 / 8या कारचा वापर केवळ चीनचे राष्ट्रपतीच नव्हे, तर १९७० मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती रिचर्ड निक्सन आणि २०१३ मध्ये फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रँकोइस ओलांद यांनीही त्यांच्या चीन दौऱ्यात केला होता. पंतप्रधान मोदींसाठीही ही कार उपलब्ध करून देणे, हा चीनच्या बाजूने एक महत्त्वाचा राजकीय आणि मैत्रीचा संकेत मानला जात आहे.