1 / 11मुंबई, पुणे, बंगळुरू सारख्या शहरांत १० मिनिटांत डिलिव्हरी म्हणजे एक मोठा स्कॅम ठरू लागला आहे. वेगवेगळे चार्जेस आणि डिफेक्टीव्ह प्रॉडक्ट यामुळे ग्राहक आता या १० मिनिटांच्या मोहजालापासून लांब जाऊ लागले आहेत. डिफेक्टिव्ह प्रॉडक्ट, एक्सपायरी डेट संपलेली उत्पादने पुन्हा माघारी पाठविण्यासाठी जी काही कसरत करावी लागते त्यालाच एक-दीड तास जात आहे. 2 / 11स्विगी, इन्स्टामार्ट आणि ब्लिंकिट, झेप्टोसारख्या स्टार्टअपच्या गोंडस नावाखाली सुरु असलेल्या कंपन्या शहरांत १० मिनिटांत खाद्यपदार्थ, दूध, कॉस्मेटीकपासून ते अगदी वह्या, रेनकोट, इलेक्ट्रॉनिक वस्तू आदी पोहोचवितात. खरेतर बहुतांश वेळा १० मिनिटे जरी दाखवत असले तरी ही उत्पादने नंतर ट्रॅक करताना २० मिनिटे दाखवितात. हाच खरा मोठा भुलभुलैया आहे. आता हे अंतर आणि वेळ पाळण्यासाठी डिलिव्हरी देणारी व्यक्ती एवढ्या जोरात, सिग्नल तोडत, हॉर्न वाजवत दुचाकी हाकतात की यांच्यामुळे अनेकदा दुसऱ्या वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे. 3 / 11कॉस्मेटीक्स, बॅडमिंटन रॅकेट आदी काहीही मागविले आणि जर ते डिफेक्टीव्ह निघाले तर तुम्ही ते तिथेच रिटर्न करू शकत नाही. कारण हे डिलिव्हरी बॉय तुमच्या हातात टेकवतात आणि पळ काढतात. मग तुम्हाला कस्टमर केअरला चॅटींग करून त्याचे फोटो पाठवा, रिटर्न रिक्वेस्ट करा आणि त्यांना समजवा यात एक-दीड तास ठरलेला असतो. कॉस्मेटीक्स किंवा अन्य पदार्थांचे सील तोडलेले असते, त्यांची एक्सपायरी डेटही संपलेली असते. तरीही तुमच्या गळात मारून हे लोक पसार होतात. बॅडमिंटन रॅकेट तुटलेले तुम्हाला आणून दिले जाते. एवढा घाणेरडा प्रकार त्या तुमच्या १० मिनिटांच्या आळसावलेपणासाठी केला जातो. 4 / 11हा त्रास सहन करण्यापेक्षा आता अनेक ग्राहक दुकानात जाऊन खरेदी करण्याकडे झुकले आहेत. याहून मोठा स्कॅम म्हणजे तुम्हाला १२५ रुपये, ७५ रुपये यांची कॅश दाखविली जाते. प्रत्यक्षात त्यातील २५-३० रुपयेच रिडीम केले जातात. जेव्हा तुम्ही कार्टमध्ये वस्तू अॅड करता तेव्हाची किंमत आणि तुम्ही ही कॅश रिडीम केल्यानंतरची किंमत यात फारतर २५-३० रुपयांचा फरक असतो. फक्त तुम्हाला आकर्षित करण्यासाठी ती १२५ रुपयांची कॅश असते. काहीवेळा याचा फायदाही होतो. 5 / 11याहून पुढे जात तुम्ही जर बिलाचे ब्रेकअप तपासले तर त्यात तुम्हाला वेगवेगळे चार्जेस दिसतात. ज्यामुळे ती वस्तू तुम्हाला मुळ दुकानदाराच्या भावाएवढ्याच दराने मिळते. जीएसटीतर असतोच, त्यात आणखीन डिलिव्हरी चार्ज, स्मॉल कार्ट चार्ज, रेन फी आणि सर्ज चार्ज असे चार्ज लावलेले असतात. यामुळे तुमचे बिल ५० रुपयांपर्यंत वाढते. यात आणखीन हँडलिंग चार्ज हा असतोच. 6 / 11यामुळे लोकही आता सुधरू लागले आहेत. या क्विक डिलिव्हरी अॅपवरून किंमतींचा फरक पाहतात, तिथे असलाच खेळखंडोबा असेल तर ते दुकानात जाऊन वस्तू घेतात. ऑफलाइन किंमती आणि वेगवेगळ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील किंमतींची तुलना केल्यानंतरच वस्तू खरेदी केली जात आहे.7 / 11या क्विक ई कॉमर्सच्या मायाजालाला भुललेल्यांचे डोळे आता उघडू लागले आहेत. यामुळे हे लोक आता या क्विक डिलिव्हरी स्कॅमपासून दूर जाऊ लागले आहेत. पुण्यातील काही ग्राहकांना झेप्टोचा अत्यंत वाईट अनुभव आलेला आहे. 8 / 11महागडी फेसक्रीम मागविली ती १०० रुपयांनीच स्वस्त मिळाली, परंतू त्यानंतर जो मनस्ताप झाला त्यात ही क्रीम मेडिकलमध्ये जाऊनच घेतली असती तर बरी असा अनुभव या त्रासलेल्या व्यक्तीने सांगितला आहे. झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयने सील तुटलेली, ओरिजिनल पॅकिंग नसलेली फेसक्रीम ग्राहकाच्या हातात मारली. हे पाहून नकोय, मागे न्या असे ग्राहकाने सांगितले असता त्याने आता नाही करता येणार, तुम्ही रिटर्न करा असे सांगितले. 9 / 11या ग्राहकाने या ट्यूबवरील एक्सपायरी डेट पाहिली तर ती कधीचीच संपलेली होती. मग सुरु झाला रिटर्न करण्याचा प्रवास, यात त्याचा दीड तास गेला. मग दुसऱ्यावेळी त्यांनी सील पॅक असलेली एक्पायरी शिल्लक असलेली क्रीम आणून दिली. प्रश्न हा पडतो की जेव्हा ती डिलिव्हरी पार्टनरकडे दिली जाते तेव्हा सील पॅक आहे की नाही, एक्पायरी आहे की नाही हे पाहिले जात नाही का? तर नाही. 10 / 11पुण्यातीलच एका व्यक्तीने मुलाला खेळण्यासाठी बॅडमिंटन रॅकेट मागविले. झेप्टोने ते पाठविले देखील. पण आतील दोरा तुटलेला होता. डिलिव्हरी स्विकारण्याची किंवा नाकारण्याची प्रथाच झेप्टोमध्ये नसल्याने त्या डिलिव्हरी बॉयने थेट ग्राहकाच्या हातात ते रॅकेट मारले आणि माघारी निघाला. दोरे तुटलेले असल्याने ग्राहकाने अॅपवरून ते रिटर्न करण्यास सांगितले तर झेप्टो चॅटवर त्यांचा प्रतिनिधी म्हणतो की ते रिटर्न होत नाही. मग बराच वेळ भांडल्यावर त्याने आम्ही प्रॉडक्ट रिटर्न घेत नाही पण पैसे परत करतो असे सांगितले व पैसे परतही पाठविले. पण पुढे आणखी एक खेळ सुरु झाला.11 / 11झेप्टो कस्टमर केअरने ते रॅकेट डिस्ट्रॉय करण्यास सांगितले होते. काही तासांनी तो डिलिव्हरी पार्टनर परत आला, साहेब मला माझा मॅनेजर मी पार्सल डिलिव्हरच केले नाही म्हणून ओरडतोय. तुम्ही ते रॅकेट परत देता का असे सांगू लागला. माझ्या मॅनेजरशी बोला म्हणत त्याने ग्राहकाला फोन दिला. त्या मॅनेजरने कंपनीने डिस्ट्रॉय करायला सांगितलेले रॅकेट आता तुम्हाला पैसे परत मिळालेत ना मग ते रॅकेट आम्हाला परत करा असे सांगत परत मागितले. म्हणजे हा मॅनेजर ते तुटके रॅकेट परत जो कोणी ऑर्डर करेल त्याला पाठविणार हे नक्की होते. कारण या लोकांना माहिती असूनही त्यांनी तुटके रॅकेट या ग्राहकाच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला होता. आता ते दुसरा बकरा कोणी सापडतो का त्याच्या शोधात होते. अशाप्रकारे हे स्कॅम केले जात आहेत.