गौतम अदानी यांच्याविरोधातील कारवाई संशयास्पद; अमेरिकेच्या 6 खासदारांनी केली मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 15:01 IST
1 / 6Adani Group America Action : अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्या कार्यकाळात अदानी समूहाविरुद्ध (Gautam Adani) करण्यात आलेली चौकशी संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. अमेरिकेच्या सहा खासदारांनी नवीन ॲटर्नी जनरल पामेला बोंडी यांना पत्र लिहून या कारवाईच्या चौकशीची मागणी केली आहे. खासदारांनी या प्रकरणाच्या पारदर्शक तपासावर भर दिला. 2 / 6भारत-अमेरिका संबंधांवर परिणाम- लान्स गुडन, पॅट फॅलन, माईक हॅरिडोपोलोस, ब्रँडन गिल, विल्यम आर. टिमन्स IV आणि ब्रायन बेबिन या खासदारांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे की, बायडेन प्रशासनाच्या काही निर्णयांचा भारत-अमेरिका संबंधांवर नकारात्मक परिणाम झाला आहे. भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा सामरिक भागीदार असून, दोन्ही देशांमध्ये अनेक दशकांपासून मजबूत राजकीय, आर्थिक आणि सामाजिक संबंध आहेत, जे आता धोक्यात येऊ शकतात.3 / 6या पत्रात पुढे अदानी समूहाविरुद्ध तपासाचा कोणताही आधार नसल्याचे म्हटले आहे. तसेच, हा तपास संशयास्पद असून, परकीय शक्तींच्या दबावाखाली तपासाचे आदेश देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. अदानी समूहाविरुद्ध यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिस (डीओजे) ची कारवाई भारतातील अधिकाऱ्यांना लाच देण्याच्या कथित कटावर आधारित आहे. पण, हे प्रकरण भारताशी संबंधित होते आणि तिथेच ते निकाली काढायला हवे होते. परंतु बायडेन प्रशासनाने अमेरिकन हिताच्या विरोधात जाऊन याविरोधात कारवाई केली, असा आरोप खासदारांनी केला आहे.4 / 6भारतासारख्या मित्र देशाशी कोणतेही ठोस कारण नसताना संबंध गुंतागुतीचे करणे हे आकलनापलीकडचे आहे. खासदारांनी याला 'दिशाहीन धर्मयुद्ध' म्हटले आणि ते भारत-अमेरिका भागीदारी कमकुवत करू होऊ शकते, अशी चिंता व्यक्त केली. तसेच, अशा निर्णयांमुळे दोन्ही देशांतील संबंधांमध्ये अविश्वास वाढू शकतो, याची निःपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे, असा इशारा खासदारांनी दिला.5 / 6बायडेन प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह- बायडेन प्रशासनाच्या न्याय विभागाच्या वर्तनाची चौकशी करण्याचे आणि या प्रकरणाशी संबंधित सर्व रेकॉर्ड सामायिक करण्याचे ॲटर्नी जनरल यांना खासदारांनी आवाहन केले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात बळकट झालेल्या अमेरिका आणि भारत यांच्यातील परस्पर आदर आणि सहकार्याची भावना कायम ठेवणे महत्त्वाचे असल्याचे मतही खासदारांनी व्यक्त केले. 6 / 6गौतम अदानी यांच्यावर कोणते आरोप?- अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत गंभीर आरोप करण्यात आले होते. कंपनीच्या गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. अमेरिकेतील आपल्या कंपनीचे कंत्राट मिळवण्यासाठी 265 मिलियन डॉलर्स किंवा सुमारे 2236 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आणि ते लपविल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हे संपूर्ण प्रकरण अदानी ग्रुपची कंपनी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि अन्य एका फर्मशी संबंधित आहे. मात्र, अदानी समूहाने हे आरोप फेटाळून लावले.