पाथरी तालुक्यातील सारोळा गावाला जाणारा टाकळगव्हाण- सारोळा अडीच कि.मी. रस्त्याचे १९९० मध्ये मातीकाम आणि मजबुतीकरण झाले होते. त्यानंतर रस्ता खराब झाला. रस्त्याअभावी ग्रामस्थांचे हाल होत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी रस्त्यासाठी अनेक वेळा आंदोलने केली. मात्र, प्रश्न मार्गी लागला नाही. २०१९ मध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत रस्त्याचे नाव समाविष्ट झाल्याने ग्रामस्थांना ३० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रस्त्याचे काम होत असल्याचा आनंद झाला. टाकळगव्हाण ते सारोळा या अडीच कि.मी. रस्त्याच्या कामासाठी १ कोटी ४७ लाख ८३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या कामाचा बोर्ड रस्त्यावर झळकला. परळी येथील अनुसया कन्स्ट्रक्शनने हे काम घेतले. ३ ऑगस्ट २०१९ रोजी कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली खरी. मात्र, मागील दोन वर्षांपासून हे काम अपूर्ण आहे. काम बंद झाल्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण केले. त्यानंतर काही दिवस काम सुरू झाले. त्यानंतर पुन्हा बंद पडले आहे. आज रोजी रस्त्याच्या कडेला गुत्तेदाराने मुरूम आणि खडी संकलन केल्याचे दिसून येत आहे. कामाची मुदतही संपली. काम मात्र पूर्ण झाले नाही. त्यामुळे ग्रामस्थांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
अनेकदा आंदोलन, उपोषण केल्यानंतरही मंजूर करण्यात आलेला रस्ता दोन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे. ग्रामस्थांना आजही रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदाराणे दुर्लक्ष केल्याने हाल होत आहेत.
-दत्तराव बुलंगे, ग्रामस्थ सारोळा, ता. पाथरी