पोहेटाकळीची घटना; पती जीव वाचविण्यात यशस्वी
पाथरी : जायकवाडीच्या डाव्या कालव्यावरील पोहेटाकळी शिवारामध्ये कालव्याच्या लगत कच्च्या रस्त्यावरुन जाणारी दुचाकी कालव्यामध्ये पडूून एक महिला पाण्यात वाहून गेली. तर तिच्या पतीला पोहता येत असल्याने कालव्याच्या काठावर येऊन आपले प्राण वाचविण्यात यशस्वी झाला. ही घटना १९ नोव्हेंबर रोजी सकाळी १0.३0 वाजेच्या सुमारास घडली.
पैठणच्या जायकवाडी धरणाचा डावा कालवा पाथरी तालुक्यातून जातो. सध्या या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. पाण्याचा प्रवाही मोठा असून कालव्याच्या पाथरी- मानवत रस्त्यालगत पोहेटाकळी शिवारातून जाणारा कच्चा रस्ता आहे. मानवत येथून येणारे पोहेटाकळीचे रहिवासी बर्याच वेळा याच रस्त्यावरुन ये-जा करतात. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी पोहेटाकळी येथील तुकाराम सोळंके हे सकाळी पत्नी आशामाती सोळंके (वय २२) हिच्यासोबत या कच्च्या रस्त्याने मानवतला जाण्यासाठी दुचाकीवरुन निघाले होते. पोहेटाकळीपासून १कि.मी.अंतरावरच हा डावा कालवा असून त्यांची दुचाकी कालव्यालगत रस्त्याने मानवतकडे निघाली होती. कालव्याच्या पोहेटाकळी शिवारातील सायफनजवळ हे पती-पत्नी दुचाकीवर आले असता दुचाकीचा तोल जावून दुचाकी थेट कालव्यात कोसळली. यावेळी पत्नी बाजूला फेकली गेली तर पती दुचाकीसह कालव्यात पडला. तुकाराम सोळंके याची पॅन्ट दुचाकीला अटकली गेल्याने तोही दुचाकीसमवेत पाण्यात बुडत होता. परंतु, त्याने पायाला झटका दिल्याने दुचाकीपासून पॅन्ट फाटून तो पाण्याबाहेर येण्यात यशस्वी झाला. दरम्यान, दुचाकी पाण्यात कोसळल्यानंतर त्याची पत्नी आशामती ही कॅनॉलमध्ये बुडत असताना 'वाचवा वाचवा' असा आवाज देत होती. मात्र अवघ्या काही मिनिटांमध्ये आशामती ही कॅनॉलमध्ये वाहून गेली.
कॅनॉल परिसरात कोणीही नसल्याने आशामतीला मात्र वाचविता आले नाही. तुकाराम याने पोहेटाकळी येथे जावून नातेवाईकांना ही माहिती दिल्यानंतर ग्रामस्थांनी आशामतीचा कॅनॉल परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, आशामती सापडली नाही. (वार्ताहर)