कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर त्याचा प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनासह इतर यंत्रणा गुंतली. लसीकरण हा कोरोनावर उपाय आहे. त्यामुळे लसीकरणावरही भर दिला जात आहे. कोरोनाचा प्रतिकार करणाऱ्या अँटिबॉडीज शरीरात तयार झाल्या का, याची तपासणी करण्यासाठी ही तपासणी केली जाते. त्याचप्रमाणे एखाद्या कुटुंबात कोरोनाचा रुग्ण आढळल्यास इतर सदस्य अँटिबॉडीज तपासून घेतात.
जिल्ह्यात हे प्रमाण अधिक नसले तरी अँटिबॉडीज तपासणी करण्यासाठी नागरिक हळूहळू पुढे येत आहेत. लस घेतल्यानंतर शरीरात अँटिबॉडीज वाढल्या का, याची खात्री करून घेतली जात आहे. एकंदर जिल्ह्यात अँटिबॉडीज तपासण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसत आहे.
युवकांची संख्या अधिक
जिल्ह्यात ठराविक ठिकाणीच अँटिबॉडीज तपासण्याची सुविधा आहे. अँटिबॉडीज तपासणाऱ्यांमध्ये युवक, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे.
एका आठवड्यात पाच ते सात तपासण्या
लसीकरणानंतर काही जण अँटिबॉडीज तपासणी करीत आहेत. मागील काही दिवसांतील आकडेवारी पाहता एका आठवड्यात सरासरी ५ ते ७ जण तपासणी करून घेत आहेत. परभणी शहरात केवळ एकाच ठिकाणी ही तपासणी करण्याची सुविधा आहे.
लसीकरण झाल्यानंतर शरीरात अँटिबॉडीज वाढतात. त्यामुळे ही तपासणी प्रत्येकाने करण्याची आवश्यकता नाही. मात्र, खात्री करण्यासाठी तपासणी केली तर हरकत नाही. मात्र, कोरोनापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने लसीकरण करणे आवश्यक आहे. - डॉ. किशोर सुरवसे, निवासी वैद्यकीय अधिकारी