परभणी येथील विभागीय नियंत्रक कार्यालय अंतर्गत हिंगोली आणि परभणी या दोन जिल्ह्यातील ७ आगारांचा कारभार पाहिला जातो. मागील सव्वा वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारंवार जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला. मात्र आता एसटी महामंडळाची सेवा पूर्वपदावर आली आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मागील काही दिवसात एसटी महामंडळ शिवशाही बस आपल्या ताफ्यात दाखल करून प्रवाशांना आरामदायी प्रवास करण्यासाठीची सोय उपलब्ध करून दिली. त्याच बरोबर प्रवास करताना प्रवासी कंटाळू नये यासाठी सर्वच बस मध्ये वाय-फायची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे प्रवासी लाल परीने प्रवास करण्यास पसंती देऊ लागले. परिणामी महामंडळाच्या उत्पादनामध्ये मोठी वाढ झाली होती. त्यातच आता प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रत्येक गाडीची लाईव्ह वेळ कळावी, यासाठी एसटी महामंडळ प्रशासनाकडून व्हेईकल ट्रेकिंग सिस्टिम अंमलात आणली असून प्रवाशांना बस स्थानकावर ताटकळत बसण्यापेक्षा बसची लाईव्ह वेळ घर बसल्या किंवा बस स्थानकांमध्ये कळणार आहे. यासाठी महामंडळ प्रशासनाने १५ ऑगस्ट मुहूर्त काढला होता. मात्र काही कारणास्तव हा मुहूर्त लांबणीवर पडला असून बसची लाईव्ह वेळ कळण्यासाठी प्रवाशांना सध्यातरी प्रतीक्षाच करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.
सात आगारात ४४४ बसेस
सद्य:स्थितीत परभणी विभागीय नियंत्रण कार्यालयांतर्गत येणाऱ्या ७ आगारातील ४४४ बसपैकी ४२० मध्ये बसमध्ये प्रणाली बसविण्यात आले असून वरिष्ठांच्या आदेशानंतर ही प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे आता बसस्थानकावर प्रवाशांचे ताटकळत बस नाही थांबली असून प्रत्येक बसचे लाईव्ह लोकेशन कळणार आहे.