गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा संसर्ग कायम असल्याने शाळा सुरू झालेल्या नाहीत. गतवर्षी ९ वी ते १२ वीचे वर्ग काही काळ सुरू झाले होते; परंतु पहिली ते आठवीचे वर्ग सुरूच झाले नाहीत; त्यामुळे या वर्गांमधील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. राज्य शासनाने नंतर सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच उत्तीर्ण करून पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गेल्या महिन्यातच दहावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. वर्षभरानंतरही कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याने येत्या शैक्षणिक वर्षातही शाळा सुरू होतील की नाही, याची चिंता विद्यार्थ्यांसह पालकांना लागली आहे. शाळेविना शिक्षकही अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे शाळा कधी सुरू होतील याची त्यांनाही चिंता लागली आहे. जोपर्यंत सर्व वयोगटांतील लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही, तोपर्यंत शाळा सुरू होण्याची शक्यता कमीच आहे.
३६ हजार ५६१ विद्यार्थी थेट दुसरीत
गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात शाळा सुरूच झालेल्या नाहीत. त्यामुळे गतवर्षी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेले ३६ हजार ५६१ विद्यार्थी शासनाच्या धोरणामुळे थेट दुसरीत गेले आहेत. या विद्यार्थ्यांनी शाळेने तोंडही पाहिलेले नाही. शाळेत शिक्षक कोण आहेत? याचीही त्यांना माहिती नाही. तरीही एकही दिवस शाळेत न जाता हे विद्यार्थी दुसरीच्या वर्गा गेले आहेत. आता दुसरीचे वर्गही कधी सुरू होतील, याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे हे विद्यार्थी शाळेत जाण्यास उत्सुक असले तरी त्यांना नाइलाजाने घरातच बसावे लागत आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे त्यांना घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे त्यांना विविध खेळ खेळण्यावरही बंधने आली आहेत. परिणामी घरात बसून ही मुले कंटाळली आहेत.
विद्यार्थी, शिक्षक, पालक म्हणतात...
कोराेनाचा वाढता प्रादुर्भाव व दुसऱ्या आणि संभाव्य तिसऱ्या लाटांच्या अनुषंगाने शिक्षकांकडे सोपविलेली कोरोनासंदर्भातील कामे पाहता प्रत्यक्ष शाळा सुरू होण्यास ऑक्टोबर महिना उजाडू शकतो.
- आबासाहेब लोंढे, शिक्षक
कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता मुलांचे संपूर्ण लसीकरण झाल्याशिवाय मुलांना शाळेत पाठवण्याचा धोका शासनाने पत्करू नये. यासाठी राज्यभरातील मुलांच्या लसीकरणाचे नियोजन शासनाने लवकर करावे.
- दादाराव काळे, पालक
आत्ता दुसऱ्या वर्षी शाळा सुरू होण्याची वाट पाहत आहोत; परंतु आईवडील म्हणतात, कोरोना संपल्यावरच शाळा सुरू होणार आहे; परंतु कोरोना कधी संपणार हे सांगत नसल्याने चिंता वाटत आहे. सारखे घरी बसून कंटाळा येत आहे.
- अर्जुन बेंद्रे,
विद्यार्थी
शिक्षणाधिकारी म्हणतात...
विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करूनच शासनाने शाळा बंद ठेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना आटोक्यात आल्याशिवाय पुन्हा शाळा सुरू होणे कठीण आहे. शाळा, विद्यार्थी, शिक्षक हा आमच्या दैनंदिन आयुष्याचा भाग आहे. शाळा बंद असल्याने आम्हीही अस्वस्थ झालो आहोत; परंतु कोरोनामुळे आमचाही नाइलाज आहे. शासन आदेशानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल.
-डॉ. सुचेता पाटेकर, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, परभणी