परभणी : राहटी येथून येणाऱ्या रायझिंग मेन लाईनला जलकुंभाचे क्रॉस कनेक्शन देण्यासाठी सहा प्रभागातील पाणीपुरवठा सहा दिवसांसाठी बंद ठेवला जाणार आहे.
शहरातील राजगोपालाचारी उद्यानातील नवीन जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे. या जलकुंभाला राहटी येथून येणाऱ्या रायझिंग मुख्य वाहिनीची जोडणी केली जाणार आहे. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने हे काम हाती घेतले आहे. त्यामुळे ३० जानेवारीपासून ते ४ फेब्रुवारीपर्यंत ६ प्रभागांमध्ये पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. शहरातील प्रभाग क्रमांक ३, ४, ५, ६ , ७ आणि प्रभाग क्रमांक १५ मध्ये हा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख तन्वीर मिर्झा बेग यांनी दिली.
वरील सहाही प्रभागांना ममता कॉलनी, खंडोबा बाजार आणि राजगोपालाचारी उद्यानातील जलकुंभातून पाणीपुरवठा केला जातो.
अमृत योजनेंतर्गत राजगोपालाचारी उद्यानात मागील अनेक वर्षापासून जलकुंभ उभारणीचे काम सुरु होते. अनेक वेळा हे काम रखडले होते. अखेर मागील महिन्यात जलकुंभाचे काम पूर्ण करण्यात आले. जलकुंभापासून जलवाहिनीही टाकण्यात आली आहे. आता प्रत्यक्ष राहटी येथील मेन रायझिंग वाहिनीवरुन जलकुंभाला जोडणी दिली जाणार आहे. त्यासाठी किमान ६ दिवसांचा कालावधी लागणार असून या काळात ६ प्रभागांमध्ये पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर वरील सहाही प्रभागांमध्ये मुबलक पाणीपुरवठा करणे मनपाला सोयीचे होणार आहे. सध्या तरी सहा दिवस निर्जळीचा सामना करावा लागेल.