गंगाखेड (परभणी ) : कोरोना नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय करणाऱ्या एक सराफा आणि दोन कापड दुकानदारांवर पोलीस व नगर परिषदेच्या संयुक्त पथकाने कारवाई केली. यावेळी त्यांच्याकडून प्रत्येकी २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच दुकानात आढळून आलेल्या ग्राहकांकडूनही प्रत्येकी २०० रुपये दंड पथकाने वाढून केला आहे.
कडक निर्बंध काळात दुकाने उघडण्यास परवानगी नसताना शहरातील अनेक कापड दुकानदार, सराफा व्यवसायिक, ऑटोमोबाईल्स चालक, चप्पल बूट विक्रेते, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल व्यवसायिक व्यापारी ब्रेक दि चैन चे नियम डावलून अर्धे शटर उघडून व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास येत आहे. याविरोधात पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, पो. शि. कृष्णा तंबूड, होमगार्ड राजू पवार, सुनील टोले, गणेश गवते, गोपाळ बोबडे व नगर परिषदेच्या पथकातील उपमुख्याधिकारी स्वाती वाकोडे, अभियंता अक्षय तळतकर, गणेश भोकरे, सुरेश मणियार, अमोल जगतकर, सुधीर गायकवाड, आकाश बर्वे यांच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी सकाळी ११:४५ वाजेच्या सुमारास डॉक्टर लेन परिसरात पाहणी केली.
यावेळी बाहेरून बंद असलेल्या एका कापड दुकानातून काही जण नवीन कपडे खरेदी करून जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. यामुळे पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी दुकानात प्रवेश केला असता दहा ते बारा ग्राहक कापड खरेदी करत असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे दुपारी १ वाजेच्या सुमारास दिलकश चौकातील मेन रोडवर असलेले एक दुकान व ज्वेलर्स ही दोन दुकाने देखील सुरु असल्याचे दिसून आले. नियमांचे उल्लंघन करणारी या तिन्ही दुकानदारांवर प्रत्येकी २० हजार रुपयांचा दंड आकरण्यात आला. तसेच यावेळी ग्राहकांकडूनहि प्रत्येकी २०० रुपये दंड वसूल केला करण्यात आला.
गेल्या दोन दिवसांपूर्वी एका कापड दुकानदारविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर ही त्याने पुन्हा दुकान सुरू ठेवून ग्राहकांची गर्दी जमविल्याने त्याच्याकडून २० हजार रुपयांचा वसूल करत त्याचे दुकान सिल करण्याची कार्यवाही करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा तीन दुकानदारांविरुद्ध दंडात्मक कार्यवाही झाल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.