येलदरी: वाढत्या कोरोना विषाणूचा पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष करत, जिंतूर तालुक्यातील येलदरी येथे आठवडी बाजारात विक्रेते दाखल झाले होते. त्यामुळे विनामास्क बाजारपेठेत ग्राहक व व्यापारी वावरताना बुधवारी दिसून आले.
जिंतूर तालुक्यातील येलदरी येथे दर बुधवारी आठवडी बाजार भरत असतो. या बाजारात २० ते २५ हून अधिक गावातील ग्रामस्थ विविध वाहनांतून खरेदी-विक्रीसाठी दाखल होतात. मात्र, सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत. त्या अनुषंगाने परभणी येथील जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनीही काही कठोर पावले उचलली आहेत. यामध्ये नागरिकांची कुठेही गर्दी होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात भरणारे आठवडी बाजार २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, येलदरी येथे बुधवारी आठवडी बाजार बंद असतानाही काही विक्रेते व नागरिक दाखल झाले होते. त्यामुळे हा बाजार जिंतूर-सेनगाव या रस्त्यावर भरविण्यात आला होता. त्यामुळे ग्रामपंचायत व तालुका प्रशासन, तसेच जिल्हा प्रशासनाने आठवडी बाजार बंद ठेवण्याच्या केलेल्या आव्हानाकडे दुर्लक्ष करत, बुधवारी येलदरी येथील आठवडी बाजारात व्यापारी व ग्राहक विनामास्क व सोशल डिस्टन्सकडे दुर्लक्ष करत फिरताना दिसून आले. त्यामुळे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अधिक कडक पावले उचलत सतर्कता बाळगावी, अशी मागणी येलदरी व परिसरातील ग्रामस्थांमधून होत आहे.