या संशोधनामुळे भविष्यात विविध संशोधन करण्यास ईस्त्रो व नासा संस्थेस भेट देण्याची संधी मिळू शकेल, असे वेदिकाने सांगितले. वेदिकाच्या या संशोधनामुळे परभणीचे नाव जागतिक स्तरावर पोहोचले आहे. या यशाबद्दल वेदिकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
१०० ग्रॅमपेक्षा कमी वजनाचा बनविला सॅटेलाईट
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊन्डेशन, हाऊस ऑफ कलाम व स्पेस झोन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ७ फेब्रुवारी २०२१ रोजी रामेश्वरम येथे अंतराळात लहान-लहान १०० उपग्रह सोडण्याचा जागतिक व महत्त्वाकांक्षी विक्रम करण्यात आला. यात देशभरातील १ हजार व महाराष्ट्रातील ३८० तसेच परभणी येथील ११ विद्यार्थी सहभागी झाले होते. नामांकित अंतराळ संशोधकांसोबत वेदिका हिचाही समावेश होता. यासाठी सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले होते. नागपूर व पुणे येथे एकदिवसाची कार्यशाळाही पार पडली.
रामेश्वरम येथे झालेल्या या विक्रमात वेदिका कडतन हिने लाईटवेट सॅटेलाइट कॉम्पिटिशनमध्ये १०० ग्रॅमपेक्षा कमी वजनाचा सॅटेलाइट हेलियम बलून लॉन्च केला आणि शास्त्रीय संशोधनासाठी वातावरणातील तापमान व आर्द्रतेचे रेकाॅर्डिंग केले. या उपक्रमामुळे तिचे नाव ५ रेकॉर्डस् बुकमध्ये नोंदविले गेले आहे. आजी शुभांगी नारायणसा कडतन तसेच आई शीतल व वडील डॉ. अमिताभ कडतन यांच्यासह कुटुंबियांच्या प्रोत्साहनाला व शिक्षकांच्या पाठिंब्यामुळेच तसेच एम. एन. पत्की, प्रसन्ना भावसार, तसेच स्पेस सायंटिस्ट मिलिंद चौधरी यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळवू शकले, असे वेदिका हिने सांगितले.