परभणी : कोरोनाच्या संसर्गावरील प्रतिबंधात्मक लस पूर्णत: सुरक्षित असून, नागरिकांनी आपल्या मनातील भीती दूर करून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले. शनिवारी मुगळीकर यांनी स्वत: लस घेतली. त्यानंतर, नागरिकांना आवाहन केले.
येथील जिल्हा रुग्णालयातील कोरोना लसीकरण केंद्रात जाऊन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्यानंतर, नागरिकांना आवाहन करताना मुगळीकर म्हणाले, इतर कोणत्याही आजारापेक्षा कोरोना आजाराला सर्व जण धास्तावून गेलेले आहेत. अनेकांच्या मनात भीती आणि शंकाही खूप आहेत. या आजाराचा प्रादुर्भाव रोखणारी प्रभावी लस आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी संशोधित केली आहे. ती पूर्णत: सुरक्षित असून, लसीकरण मोहिमेच्या या पहिल्या टप्प्यात मी स्वत: घेतली आहे. इतरांनीही या लसीकरणाची भीती मनातून दूर करावी. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात शासनाने कोविड निर्मूलनासाठी कार्य करणाऱ्या सर्व शासकीय यंत्रणातील संबंधित अधिकारी-कर्मचारी यांचा समावेश केला आहे. टप्प्याटप्याने ही लस सामान्य नागरिकांपर्यंतही लवकरच उपलब्ध होणार असल्याचे मुगळीकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे व इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.