स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कारवाईच्या अनुषंगाने रविवारी जिंतूर तालुक्यात दाखल झाले असता त्यांना येलदरी येथे अजतम खान कलंदर खान (राज मोहल्ला जिंतूर) याच्या गॅरजेमध्ये चोरीची दुचाकी असल्याची माहिती मिळाली. त्यावरून संबंधित गॅरेजमध्ये जाऊन पोलीस कर्मचाऱ्यांनी दुचाकीची पाहणी केली असता दुचाकीवर नंबरप्लेट नव्हती. या दुचाकीबाबत अजतम खान याच्याकडे कागदपत्रे विचारली असता त्याच्याकडे ती आढळून आली नाहीत. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. खान याची अधिक चौकशी केली असता त्याने ती दुचाकी मधुकर पांडुरंग घुले (रा. सावळी, ता. जिंतूर) याच्याकडून विकत आणल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीस आरोपी खान यास मधुकर घुले याच्याकडे घेऊन सावळी येथे जात असताना वाटेत ग्रामस्थांची गर्दी दिसली. याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी गावात दोन गटांत हाणामारी झाल्याचे सांगितले. यावेळीे पोलिसांनी मधुकर घुले कोठे राहतो, असे विचारले असता तो आताच पळून गेल्याचे संबंधित ग्रामस्थाने सांगितले. यावेळी रस्त्याने जात असताना एक व्यक्ती रस्त्याच्या बाजूला जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आले. त्याची विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव मधुकर घुले असे सांगितले. त्याची विचारपूस केली असता त्याने दुचाकी अजतम खान याला विकल्याचे व ती चोरीची असल्याचे सांगितले. पोलिसांनी ती दुचाकी जप्त करून जखमी घुले यास दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले. याबाबत पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले यांच्या फिर्यादीवरून आरोपी अजमत खान व मधुकर घुले यांच्याविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकी चोरीप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:19 IST