परभणी : जिल्ह्यात आतापर्यंत ४४ हजार ८९४ जणांना करोनाची लागण झाली असताना, महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत आतापर्यंत केवळ १ हजार १४० करोनाबाधितांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत, अशी माहिती योजनेच्या समन्वयकांनी दिली आहे. त्यामुळे करोनाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत अवघ्या ४ टक्के करोनाबाधितांनाच या योजनांचा लाभ मिळाला असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
कोरोना महामारीच्या उद्रेकानंतर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार देण्याची घोषणा राज्य सरकारने केली. या योजनेंतर्गत सर्व शिधापत्रिकाधारकांना या योजनांचा लाभ घेता येणार असून, संलग्न रुग्णालयांनी श्वसनसंस्थेच्या लक्षणांशी संबंधित २० हजारांच्या पॅकेजेसमध्ये कोरोनाबाधितांना मोफत उपचार देणे अपेक्षित आहे. मात्र, या योजनेअंतर्गत सामान्य रुग्णांना देण्यात आलेल्या लाभाचे प्रमाण फारच अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे. परभणी जिल्ह्यात या योजनेच्या लाभार्थ्यांचे प्रमाण नगण्य आहे. या योजनेंतर्गत पिवळे, केशरी व पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांना लाभ घेता येईल, तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका व आधार कार्ड आवश्यक आहे. परभणी जिल्ह्यामध्ये पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये आतापर्यंत 44 हजार 894 रुग्णांना कोरोनाची लागण झालेली आहे. 39 हजार 459 रुग्ण उपचार घेऊन या आजारातून बरे झाले आहेत. आतापर्यंत 1 हजार 86 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सद्य:स्थितीत ४ हजार ३४९ रुग्ण कोरोना या संसर्गजन्य आजारावर उपचार घेत आहेत. कोरोनाच्या महामारीत नागरिकांना उपचार घेण्यास सुलभ व्हावे, आर्थिक चणचण त्यांच्यासमोर उभी राहू नये यासाठी राज्य शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजना अमलात आणली. या योजनेंतर्गत अंतर्गत कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्याचे निर्देश दिले. मात्र, जिल्ह्यातील खाजगी व शासकीय रुग्णालयांनी आतापर्यंत केवळ 1 हजार 140 रुग्णांवर या योजनेंतर्गत उपचार केले आहेत. उर्वरित रुग्णांना आर्थिक झळ सहन करीत उपचार घ्यावे लागले. त्यामुळे जन आरोग्य योजनेंतर्गत केवळ आतापर्यंत ४ टक्के रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे या योजनेतून उपचार करण्यास खाजगी रुग्णालय प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
केवळ 82 रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार
महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत ४ खासगी रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. या रुग्णालयांत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केल्यास 20 हजार रुपयांचे पॅकेज राज्य शासनाच्या वतीने रुग्णालय प्रशासनाला देण्यात येते. मात्र, कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत आतापर्यंत 44 हजार 894 रुग्णांनी शासकीय व खाजगी रुग्णालयात कोरोना आजारावर उपचार घेतले आहेत. मात्र, खासगी रुग्णालयात ८२, तर शासकीय रुग्णालयात 1027 रुग्णांवर या योजनेंतर्गत उपचार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे परभणी शहरातील स्पर्श मल्टी स्पेशालिस्ट या रुग्णालय प्रशासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे रुग्णांची कुचंबणा होत असून, आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.
अशी करा नोंदणी
या योजनेशी संलग्न रुग्णालयांत आरोग्य मित्रांकडून नोंदणी करता येईल, तसेच कागदपत्रे जवळ नसली, तरी ''इमर्जन्सी टेलिफोनिक इंटिमेशन'' देऊन उपचार घेता येतील आणि नंतर कागदपत्रे मागविता येतील. कागदपत्रांची फोटोकॉपी देता येईल, व्हॉट्सॲप, ई-मेलवरही पाठविता येईल, शिधापत्रिकेची ऑनलाइन प्रतही सादर करता येईल.
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना (परभणी जिल्ह्याचा लेखाजोखा)
संलग्न कोव्हिड रुग्णालये : 11
योजनेचा लाभ घेतलेल्या कोरोना रुग्णांची संख्या : 1 हजार 140
रुग्णालयांनी टाळाटाळ केल्यास इथे करा तक्रार
खासगी रुग्णालयांनी कोरोनाबाधितांवर ''एमजेपीजेएवाय'' योजनेंतर्गत उपचार करण्यास टाळाटाळ केल्यास, अथवा उपचारांची बिले आकारल्यास योजनेच्या १८००२३३२२०० या क्रमांकावर तक्रार करता येईल. याशिवाय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक, तसेच जिल्हा समन्वयकांकडेही लेखी तक्रार करता येईल.