परभणी जंक्शन येथून नांदेड विभागाच्या वतीने सध्या २५ रेल्वे सुरू आहेत. यात ३ पॅसेंजर रेल्वेचा समावेश आहे. यापूर्वी औरंगाबाद-हैदराबाद, पूर्णा- हैदराबाद, हैदराबाद-परभणी पॅसेंजर रेल्वे होत्या. त्या सध्या विशेष एक्स्प्रेस म्हणून परिवर्तित केल्या आहेत. यामुळे प्रवाशांना एक्स्प्रेसचा दर्जा मिळत आहे. मात्र, त्यासाठी अतिरिक्त तिकीट मोजावे लागत असल्याचे दिसून येते.
जिल्ह्यातून जाणाऱ्या पॅसेंजर
नांदेड-दौंड बंद
निजामाबाद-पंढरपूर बंद
निजामाबाद-पुणे बंद
औरंगाबाद-हैदराबाद सुरू
पूर्णा-हैदराबाद सुरू
परभणी-तांडूर सुरू
चार रेल्वेचा प्रस्ताव कायम
नांदेड विभागातील नांदेड-दौंड, निजामाबाद-पंढरपूर, निजामाबाद-पुणे, दौंड-नांदेड यातील रेल्वेच्या ये-जा करणाऱ्या सहा फेऱ्या एक्स्प्रेसमध्ये परिवर्तित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, कोरोनामुळे मागील वर्षापासून रेल्वे सेवा बंद पडली. त्यात टप्प्याटप्प्याने उर्वरित रेल्वे आजतागायत सुरू झाल्या. परंतु, या रेल्वेच्या बाबत अद्याप निर्णय झाला नाही.
विशेष रेल्वेमुळे मोजावे लागतात अतिरिक्त पैसे
सध्या सुरू असलेल्या ३ विशेष एक्स्प्रेस रेल्वे केवळ तालुक्याच्या व महत्त्वाच्या स्टेशनला थांबतात. यामुळे पूर्वी पॅसेंजर रेल्वे जेथे थांबत होत्या त्या ठिकाणी जाण्यास प्रवाशांची अजूनही गैरसोयच आहे. मात्र, विशेष रेल्वेच्या नावाखाली तिकीटही वाढले आणि आरक्षणाचे पैसेही वाढले आहेत.
सर्वसामान्यांना एक्स्प्रेस कशी परवडणार ?
एक्स्प्रेस रेल्वे सुरू केल्या हे चांगले असले तरी या रेल्वेचा लूज टाइम अद्याप कमी केलेला नाही. त्यामुळे पॅसेंजर प्रमाणेच अजूनही प्रवासाला वेळ लागत आहे. प्रवासाचे पैसे वाढले त्याप्रमाणे प्रवासासाठी लागणारा वेळ कमी होणे अपेक्षित आहे. - तुषार गिते, प्रवासी.
औरंगाबाद मार्गावर दररोज दुपारी बारा ते सायंकाळी सहाच्या दरम्यान रेल्वे सुरू नाही. या कालावधीत पूर्वी धावणारी काचिगुडा-मनमाड पॅसेंजर सुरू करून तिला एक्स्प्रेस केल्यास अनेकांची सोय होऊ शकते.
- निलेश पाटील, प्रवासी.