जोगवाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गावातील चिमुकले विद्यार्थी ज्ञानाचे धडे गिरविण्यासाठी येतात. सध्या कोरोनामुळे शाळा बंद असल्या, तरी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्याचा उपक्रम सुरूच आहे. शासनाने उदात्त भूमिकेतून गरजूंसाठी हा निर्णय घेतला असला, तरी कष्ट न करता ऐतखाऊ वृत्तीच्या व्यक्तींची चोरी करण्याची सवय जात नाही. याचाच अनुभव जोगवाडा येथील ग्रामस्थ व शिक्षकांना आला आहे. विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्याच्या अनुषंगाने जि.प. शाळेचे मुख्याध्यापक राहू सखाराम गुहाडे हे एप्रिलमध्ये सकाळी शाळेत गेले असता त्यांच्या कक्षाच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी आत जाऊन पाहिले असता येथील एक इन्व्हर्टर एम.सी.बी बाॅक्स, इन्व्हर्टरच्या २ बॅटऱ्या आणि एक टीव्ही स्टॅबिलायझर असे एकूण २० हजार ४०० रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले. याबाबत मुख्याध्यापक गुहाडे यांनी चारठाणा पोलीस ठाण्यात मंगळवारी फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
ज्ञानमंदिरात चोरी; २० हजारांचे साहित्य लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:18 IST