परभणी : तब्बल दहा महिन्यांच्या खंडानंतर जिल्ह्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा २७ जानेवारी रोजी सुरू झाल्या. अनेक दिवसांनंतर शाळेत दाखल झालेल्या विद्यर्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. शाळांनीही कोरोनाच्या अनुषंगाने पूर्ण तयारी करीत विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत केले.
कोरोनाच्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत. आता हा संसर्ग कमी झाल्याने शाळा-महाविद्यालये सुरू झाली आहेत. डिसेंबर महिन्यात नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले होते. या वर्गांमध्ये आता बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून येत आहे. शासनाच्या निर्देशानुसार २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले. जिल्हा परिषद, खाजगी, अनुदानित अशा सर्वच शाळा सुरू झाल्या आहेत. पहिल्याच दिवशी १०० टक्के शाळा सुरू झाल्याची माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यापूर्वी शिक्षण विभागाने पालकांकडून संमतीपत्र घेतले आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने मास्क घालून विद्यार्थी शाळेत दाखल झाले होते. शाळा प्रशासनाने या विद्यार्थ्यांची थर्मल गनच्या साह्याने तपासणी केली, तसेच एक दिवस आधीच संपूर्ण शाळा सॅनिटाईज करण्यात आली होती. शिक्षकांच्याही कोरोना तपासण्या करण्यात आल्या असून, कोरोनाच्या अनुषंगाने संपूर्ण काळजी घेत शाळांना सुरुवात करण्यात आली. विशेषत: ग्रामीण भागात विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून आला. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. पालमक, मानवत या तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी शाळेत उपस्थित राहिले.