परभणी जिल्ह्यासह राज्यभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन कोरोनावरील उपाययोजना करण्यात व्यस्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात आता पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. त्यामुळे मागणी केलेल्या गावांना पाण्याचे टँकर सुरू करणे आवश्यक आहे. यापूर्वी हे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना होते. आता जिल्हाधिकारी कोरोना उपाययोजनांमध्ये व्यस्त असल्याने ३० जूनपर्यंत टँकर सुरू करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
दरम्यान, पाणी टंचाई निवारणाच्या कामासाठी तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना व विंधनविहिरी विशेष दुरुस्ती योजना आदींच्या प्रस्तावांना भौतिक व आर्थिक निकषानुसार ३० मार्चपर्यंतच मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता; परंतु कोरोनाची स्थिती लक्षात घेता, त्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. असे असले तरी सदरील कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे, असेही यासंदर्भात राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.