‘प्लास्टिकमुक्ती अभियान राबवा’
परभणी : पर्यावरण संवर्धनासाठी जिल्ह्यात प्लास्टिकमुक्ती अभियान राबविण्याचा आदेश जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी सर्वच विभागप्रमुखांना नुकताच एका पत्राद्वारे दिला आहे. या अनुषंगाने शिक्षणाधिकारी सूचिता पाटेकर यांनी शाळांनाही हे अभियान राबवण्याचे सूचित केले आहे.
रस्ता दुरुस्तीची नागरिकांची मागणी
परभणी : शहरातील सर्व शिक्षा अभियान विभागाच्या समोरून संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. मनपाकडे याबाबत अनेक वेळा मागणी केली आहे.
१,७६१ शाळांना क्रीडांगणाची व्यवस्था
परभणी : जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या १ हजार ७६१ शाळांना क्रीडांगणे उपलब्ध आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ८१९, तर खाजगी अनुदानित ४७५ शाळांचा समावेश आहे. शिवाय खाजगी विनाअनुदानित ४५५, नगरपालिकेच्या ५, शासकीय ७ शाळांनाही क्रीडांगण उपलब्ध आहे.
सहविचार बैठक
परभणी : सकल ओबीसी समाज संघटनेच्या वतीने १३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता शहरातील एकतानगरच्या पाठीमागील बाजूस असलेल्या श्रीराम मंगल कार्यालयात सहविचार बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
जमिनीची मागणी
परभणी : तालुक्यातील धर्मापुरी येथे गायरान जमीन गेल्या अनेक वर्षांपासून कसत आहे. त्यामुळे उदरनिर्वाहसाठी ही जमीन देण्यात यावी, अशी मागणी जग्गू दगडू भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर भोसले यांच्यासह एकूण १८ जणांची स्वाक्षरी आहे.
संबोधीची बैठक
परभणी : संबोधी मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची १३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता शहरातील सावली शासकीय विश्रामगृह येथे बैठक बोलावण्यात आली आहे. यावेळी संस्थापक अध्यक्ष भीमराव हत्तीअंबिरे हे मार्गदर्शन करणार आहेत.