ऑनलाईन लोकमत
परभणी : मानव विकास योजने अंतगर्त असलेली बस गावात येत नसल्याने धर्मापूरी येथील विद्यार्थिनींनी सकाळी ८ वाजता परभणी- जिंतूर महामार्गावर रास्ता रोको केला. त्यामुळे एक तास वाहतूक ठप्प होती. यानंतर विभागीय नियंत्रकानी घटना स्थळी येऊन बस सोडण्याचे आश्वासन दिल्या नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले .
धर्मापूरी येथील जवळपास २०० विद्यार्थिनी परभणी येथे रोज शिक्षणानिमित्त जातात. परंतु, गावात मानव विकास मिशन अंतगर्त असलेली बस येत नसल्याने विद्यार्थिनींची हेळसांड होत आहे. परिणामी त्यांना रोज खाजगी वाहतुकीने परभणीत यावे लागते. वारंवार बस सोडण्याची मागणी करूनसुद्धा बस सुरु होत नसल्याने आज सकाळी विद्यार्थिनींनी एकत्र येत परभणी- जिंतूर रस्त्यावरील वाहतूक अडवली. सकाळी अचानकच विद्यार्थीनीनी आक्रमक होत आंदोलन केल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
सुमारे २०० विद्यार्थिनीच्या या आंदोलनाची माहिती मिळताच अर्ध्या तासानंतर विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे हे आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी मानव विकास योजनेची बस सोडण्याचे आश्वासन दिले. यानंतर एक बस गावात दाखल झाल्यानंतर विद्यार्थिनींनी आंदोलन मागे घेतले.