परभणी : जिल्ह्यात कोरोना लसीचा साठा संपलेला असतानाच १८ वर्षांपुढील नागरिकांच्या लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला आहे. शनिवारी पहिल्याच दिवशी शहरातील केवळ सहा केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. त्यामुळे जिल्हाभरातील नागरिकांना लस मिळविण्यासाठी धावपळ करावी लागली.
जिल्ह्यासाठी कोविशिल्डचे सात हजार डोस प्राप्त झाले असून, ही लस फक्त १८ वर्षांपुढील नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. परभणी शहरातील लसीकरण केंद्रांवर १८ वर्षांपुढील नागरिकांसाठी लसीकरण केले जात आहे. त्यासाठी कोविन ॲपवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. मात्र पहिल्याच दिवशी अनेकांना नोंदणीची माहिती नव्हती. त्यामुळे येथील जायकवाडी परिसरातील महानगरपालिकेच्या रुग्णालयातील केंद्रावर लसीकरणासाठी ४५ वर्षांपुढील नागरिकांनीही मोठी रांग लावली होती. तसेच अनेक जण नोंदणी न करतात लस घेण्यासाठी केंद्रावर दाखल झाले. त्यामुळे काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. नोंदणी केल्यानंतरच लस दिली जाणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केल्याने अनेकांना लस न घेताच घरी परतावे लागले. जिल्ह्यात सध्या लसीचा साठा संपला असून, शहरी भागातच १८ वर्षांपुढील नागरिकांना नोंदणी करून लस दिली जात आहे. त्यातही अनेक केंद्रांवर लसीचा कोटा संपल्याचे संकेतस्थळावर दर्शविले जात आहे. ग्रामीण भागात तर लस उपलब्ध नसल्याने केंद्र बंद ठेवावे लागत आहेत. सध्या तरी लसीसाठी नागरिकांची धावपळ होत आहे. दोन दिवसांपासून परभणी शहरात १८ वर्षांत पुढील नागरिकांना लसीकरण होत आहे. त्यामुळे ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस उपलब्ध होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. शहरात रविवारीदेखील लसीकरण सत्र चालविण्यात आले. सर्वच केंद्रांवर लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
८४५ जणांना लसीकरण
परभणी शहरातील केंद्रांवर दोन दिवसांमध्ये ८४५ जणांना लसीकरण करण्यात आले. शहरात एकूण सहा केंद्र सुरू ठेवण्यात आले आहेत.
कोविन ॲपवर नोंदणी करा
राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोविन ॲपवर नोंदणी करूनच लसीकरण केले जाणार आहे. त्यामुळे १८ वर्षांपुढील नागरिकांनी नोंदणी करूनच केंद्रांवर जावे. नोंदणी केल्यानंतर लसीकरणाचा दिनांक आणि ठिकाण निवडणे आवश्यक आहे.