हरभऱ्याच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव
परभणी : जिल्ह्यात हरभऱ्याच्या पिकावर काही भागात अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यावर्षी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने हरभऱ्याचे क्षेत्र वाढविण्यात आले आहे. मात्र अनेक भागात मर या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिबंधक औषधींचा वापर करीत आहेत. कृषी तज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन या संकटातून बाहेर काढावे, अशी मागणी होत आहे.
सिमेंट रस्त्याला मधोमध भेगा
परभणी : पारदेश्वर मंदिरापासून जुन्या पावर हाऊसकडे जाणाऱ्या रस्त्यावर मधोमध मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. त्यामुळे वाहने घसरुन अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. दोन वर्षांपूर्वीच या सिमेंट रस्त्याचे काम करण्यता आले होते. मात्र सध्या हा रस्ता वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. मनपाने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
शहरातील सिग्नल यंत्रणा शोभेची
परभणी : शहरातील सिग्नल यंत्रणा मागील अनेक दिवसांपासून बंद असल्याने शोभेची ठरली आहे. शहरात वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सिग्नल सुरू करणे गरजेचे झाले आहे. मात्र मनपा आणि पोलीस प्रशासनाच्या उदासिनतेमुळे लाखो रुपयांची ही यंत्रणा धूळ खात उभी आहे. शहरात वाढलेली वाहतूक लक्षात घेता, सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी होत आहे.
शहर स्वच्छतेवर मनपाचा भरश
परभणी : मनपा प्रशासनाने शहर स्वच्छतेवर भर दिला आहे. सकाळच्या वेळी शहरातील मुख्य रस्त्यांवर दररोज स्वच्छता केली जात आहे. गुरुवारी येथील उड्डाण पूल भागात स्वच्छता कर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबविली. त्याचप्रमाणे स्टेडियम कॉम्प्लेक्स भागातही सकाळच्या सुमारास स्वच्छता करण्यात आली. शहरातील अन्य भागातही याच पद्धतीने स्वच्छतेची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी होत आहे.
पाण्याच्या विक्रीला शहरात प्रारंभ
परभणी : शहरात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अनेक नव्या वसाहतीत नळ योजना नसल्याने या नागरिकांना विकतच्या पाण्यावर दिवस काढावे लागतात. मागील वर्षीचा हा अनुभव आहे. यंदा भूजल पातळी सध्या तरी स्थीर असली तरी उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. त्यामुळे संभाव्य पाण्याची मागणी लक्षात घेऊन अनेक पाणी व्यवसायिकांनी आतापासूनच पाण्याच्या विक्रीला प्रारंभ केला आहे.