परभणी : शासनाच्या ‘ब्रेक द चेन’ अभियानांतर्गत जिल्ह्यात बुधवारी वाहतूक आणि इतर व्यवहार तर सुरळीत राहिले. मात्र बाजारपेठेतील निम्म्यापेक्षा अधिक दुकानांचे शटर डाऊन झाल्याने व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागला.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने काही व्यवसायांवर निर्बंध लावले आहेत. या निर्बंधांची मंगळवारी पहिल्या दिवशी अंमलबजावणी झाली नाही. आदेशातील संभ्रमामुळे अनेक व्यावसायिकांनी नेहमीप्रमाणे बाजारपेठेत दुकाने सुरू ठेवली होती. मात्र बुधवारी प्रशासनाकडून केलेल्या आवाहनामुळे दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरातील मुख्य बाजारपेठ भागातील निम्म्यापेक्षा अधिक दुकाने बंद करण्यात आली. कच्छी बाजार, गुजरी बाजार, सुभाष रोड, नानलपेठ रोड भागात बहुतांश दुकाने ७ एप्रिल रोजी बंद होती. या भागात मुख्यत्वे कापड, इलेक्ट्रॉनिक्स, भांडी व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. बुधवारी नेहमीप्रमाणे व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवली होती. मात्र प्रशासनाच्या आवाहनानुसार ही दुकाने बंद करण्यात आली. काही व्यावसायिकांनी शटर अर्धे बंद करून ग्राहकांची प्रतीक्षा केली. या भागातील किराणा, भाजी विक्रेत्यांची दुकाने मात्र सुरू असल्याचे पहावयास मिळाली.
बाजारपेठ भागात दुपारच्या सुमारास सर्वच व्यापारी उपस्थित होते. अनेक व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांसमोर बसून निर्णयाची प्रतीक्षा केली. मात्र जी दुकाने अत्यावश्यक सेवेत मोडत नाहीत ती बंद करण्याचा निर्णय असल्याने दिवसभर दुकाने सुरू करता आली नाहीत त्यामुळे अनेक दिवसांनंतर प्रथमच बाजारपेठेतील निम्म्यापेक्षा अधिक दुकानांचे शटर्स डाऊन झाल्याचे पहावयास मिळाले.
बाजारपेठेतील गर्दी कायमच
बाजारपेठ भागात होत असलेल्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने हे निर्बंध लावण्यात आले आहेत. जिल्ह्यात सायंकाळनंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बाजारपेठ बंद असली तरी वाहतुकीसाठी कोणतेही निर्बंध नाही. सर्वच रस्त्यांवर बुधवारी वाहनांची गर्दी दिसून आली. बाजारपेठेत तर वाहतुकीची कोंडीही झाल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे ज्या कारणासाठी निर्बंध लावले, त्याचा फारसा परिणाम होत नसल्याचे दिसून आले. मुख्य बाजारपेठेसह सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने आणि गर्दी होत असल्याने भीती कायमच आहे.
फळगाड्यांचा रस्त्यांवरून वावर
भाजी, फळ विक्रीला मुभा असल्याने बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गाड्यांवर फळे विक्री करताना दिसून आले. मात्र वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी या फळ विक्रेत्यांना रस्त्यावरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दिवसभर फळांची विक्री करणारे अनेक हातगाडे रस्त्यावरून जाताना दिसून आले. यातून पुन्हा वाहतूक कोंडी झाली.