शहरातील मोंढा परिसरातील श्रेया ट्रेडिंग कंपनीसमोर रेशनचा गहू असलेले दोन संशयित वाहने १० जुलै रोजी आढळली होती. त्यावरून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने पोलीस उपनिरीक्षक व्ही.एस. पुयड व त्यांच्या पथकाने संजय जनधन केदार (रा.तोटेवडगाव, ता.शेवगाव, जि.अहमदनगर) याच्या ताब्यातील एम.एच.०५/डी.के. ५८१३ हेआयशर वाहन व त्यातील २४० गव्हाचे पोते तसेच प्रवीण अशोक खेडकर (रा.कोनोशी, ता.शेवगाव, जि.अहमदनगर) याच्या ताब्यातील एम.एच.०५/डी.के.९९४४ व या वाहनातील २४० गव्हाचे पोते जप्त करून ही दोन्ही वाहने कोतवाली पोलीस ठाण्यात लावली होती. या दरम्यान जप्त वाहनामधील गव्हाची चौकशी कोतवाली पोलिसांमार्फत सुरू होती. याच दरम्यान, १९ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते रात्री ८ वाजेच्या दरम्यान, एम.एच.०५/डी.के.५८१३ या क्रमांकाचे वाहन पोलीस ठाण्याच्या आवारातून गायब झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी वाहनाचा शोध घेतला, तेव्हा चालक संजय केदार याने त्याचे मालक बाळू जगन्नाथ कवडे याच्या सांगण्यावरून परस्पर हा टेम्पो पळवून नेला. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक वडेन्ना आरसेवार यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस ठाण्यात वाहन जप्त असताना आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील असताना एमएच ०५/डी.के.५८१३ आणि त्यातील गव्हाचे पोते असा ६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी संजय केदार व बाळू जगन्नाथ कवडे या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
जप्त केलेला आयशर परस्पर पळविला; दोघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:21 IST