पालम शहरात कल्याण नावाचा मटका जोरात सुरू आहे. या अनुषंगाने शहरातील बस स्टॉप परिसरात मटका सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून २३ ऑगस्ट रोजी दुपारी ३.४० च्या सुमारास पोलिसांच्या पथकाने लोहा ते गंगाखेड रोडवरील श्रद्धा पान सेंटर येथे धाड टाकली असता पोलिसांना पाहुणे उपस्थित अनेक मटका बहाद्दरांनी धूम ठोकली. यावेळी पोलिसांनी मटका घेणारा भालचंद्र उत्तमराव रोकडे याला ताब्यात घेतले. यावेळी त्याने पोलिसांना झडती घेण्यास मज्जाव केला. त्यामुळे पोलिसांनी खाक्या दाखताच त्याने झडती घेऊ दिली. यावेळी त्याच्याकडून रोख १२ हजार ६३० रुपये व जुगाराचे साहित्य, मोबाइल आढळून आला. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने लोहा येथील बाबर नावाच्या व्यक्तीसाठी मटका घेत असल्याची कबुली दिली. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक संदीप व्यंकटराव भोसले यांनी सोमवारी पालम पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. त्यावरून आरोपी भालचंद्र उत्तमराव रोकडे व बाबर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना पाहून मटका खेळणाऱ्यांनी धूम ठोकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:23 IST