महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या शीर्षकाखाली बियाणे घटकाचा लाभ देण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेंतर्गत लाभार्थ्यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेतील सोयाबीन, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी आदी अनुदानित बियाणे उपलब्ध करून घेण्यासाठी १५ मेपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी महाडीबीटी संकेतस्थळावर जाऊन या योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सामुदायिक सेवा केंद्र, ग्रामपंचायतीमधील संग्राम केंद्र यांच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना आधार क्रमांक संकेतस्थळावर नोंद करावा लागेल, असे कृषी विभागाने सांगितले. महाडीबीटी पोर्टल योजनेत ‘अर्ज एक, योजना अनेक’ या सदराखाली ही संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.