लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेता यावा, यासाठी पाचवी व आठवी वर्गत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते. मात्र पहिली ते अकरावीच्या विद्यार्थ्याचे वर्षभराचे मूल्यामापन करणे गरजेचे असताना य विद्यार्थ्यांची मात्र परीक्षा घेतली जात नसल्याने पालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करून त्यांना पुढील वर्गात पाठविण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला तरी शिक्षण विभागाने नववी ते अकरावीच्या परीक्षाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही? तर दुसरीकडे प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेता यावा, यासाठी पाचवी व आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचे नियोजन २३ मे रोजी केले जात आहे, तर दुसरीकडे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्याचे वार्षिक मूल्यमापन करणे गरजेचे आहे. त्यात विद्यार्थ्याने कशा पद्धतीने अभ्यास केला हे पाहिले पाहिजे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे शक्य होणार नसल्याने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने उत्तीर्ण केले आहे, तर दुसरीकडे शिष्यवृत्तीच्या परीक्षा घेतल्या जात असल्याने परभणी जिल्ह्यातील पालकांमधून शिष्यवृत्तीची परीक्षा होऊ शकते तर शाळेची का नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पालक काय म्हणतात...
अनलॉक प्रक्रियेनंतर पाचवी ते बारावीचे वर्ग नियमित सुरू झालेले होते. मात्र त्यानंतर कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा निर्बंध आले. त्यामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्यात आले. मात्र गुणवत्तेवरचे काय?
- राधाकिशन माेरे, पालक
एकीकडे शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते, तर दुसरीकडे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास केले जाते. विद्यार्थ्यांची त्या त्या वर्गातील अभ्यासक्रमाची पातळी व क्षमता यांचे मूल्यापनांसाठी परीक्षा आवश्यक आहे.
- रामेश्वर जाधव, पालक
ही ढकलगाडी काय कामाची
कोविड काळात ऑनलाइन, ऑफलाइन, यू-ट्यूब, गुगलच्या माध्यमातून पहिली ते अकरावीच्या विद्यार्थ्याचे शिक्षण सुरू होते. परंतु, राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहून राज्याच्या शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण केले आहे. या विद्यार्थ्याचे वर्षभराचे मूल्यांकन करणे गरजेचे असतानाही शिक्षण विभागाने मात्र त्याकडे सध्याच्या कोरोनाच्या आपत्तीत दुर्लक्ष केले आहे.
परीक्षेबाबत तज्ज्ञ काय म्हणतात...
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास किती झाला. यासाठी मूल्यामापन ही आवश्यक क्रिया आहे. सर्व विषयाची परीक्षा शक्य नसेल तर किमान गणित, विज्ञान व इंग्रजी या विषयाची ऑफलाइन परीक्षा घेणे गरजेचे आहे.
- सदानंद देशमाने
शिक्षणतज्ज्ञ
शिष्यवृत्ती परीक्षा देणारे विद्यार्थी मर्यादित असतात. परीक्षेचा वेळही मर्यादित असतो. त्यामुळे ही परीक्षा ऑनलाइन घेता येते. मात्र पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सद्यस्थितीत घेणे शक्य नाही.
- भुजंग थोरे
शिक्षणतज्ज्ञ
यावर्षी कोरोनाच्या काळात कधी ऑफलाइन, तर कधी ऑनलाइन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात आले. त्यामुळे किमान ऑनलाइन परीक्षा घेणे आवश्यक होते. मात्र शासनाने सरसकट पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.
- राजू वाघ, शिक्षणतज्ज्ञ