परभणी : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शिक्षकांना महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांच्या सहवासितांचे शोध घेण्याचे काम लावले असून, या कामाला कास्ट्राईब शिक्षक संघटनेने विरोध केला आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. परभणी तहसीलदारांनी रुग्णांच्या सहवासितांचा शोध घेणे व गृह अलगीकरणातील रुग्णांचा पाठपुरावा करण्याचे काम ग्रामीण भागातील शिक्षकांना दिले आहे. यात बहुतांश रुग्ण हे परभणी शहराच्या हद्दीतील आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शिक्षकांचे काम ग्रामीण भागातील आहे. त्यामुळे त्याच भागातील कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम शिक्षकांकडून योग्य पद्धतीने होऊ शकते. शहरी भागात काम करताना शिक्षकांना अडचणी निर्माण होतील. तेव्हा महानगरपालिकेच्या हद्दीतील शिक्षकांना शहरी भागातील काम द्यावे तसेच ५० वर्ष वयापेक्षा अधिक वय असलेल्या शिक्षकांना या कामातून वगळावे, अशी मागणी कास्ट्राईब शिक्षक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या संघटनेचे अध्यक्ष दीपक पंडित आणि कार्याध्यक्ष संभाजी वागतकर यांनी या संदर्भात जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले असून, त्यात तहसीलदारांनी दिलेली यादी रद्द करून शिक्षकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील काम द्यावे तसेच ५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या शिक्षकांना यादीतून वगळावे, अशी मागणी केली आहे.