परभणी : परभणी विधानसभा मतदार संघात ग्रामीण भागात शिवसेनेला ५४टक्के तर शहरी भागात २९ टक्के मते मिळाली आहेत. ग्रामीण भागातील मतदानावरच शिवसेनेचा विजय साकारल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
परभणी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. २५ वर्षांपासून शिवसेनेचे या मतदारसंघावर वर्चस्व आहे. त्यामुळे यावेळी मतदार काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले होते. यावेळच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे युती आणि आघाडीतील पक्ष स्वतंत्र होवून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने मतदारही विभागातात की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. त्यातूनच परंपरागत दुहेरी अथवा तिहेरी होणारी लढत यावेळेस पंचरंगी झाली. पाच प्रमुख पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने निकाल काय लागतो याकडे लक्ष लागले होते. निकालांती मतदारांनी पुन्हा एकदा शिवसेनेलाच पसंती दिली. त्यामुळे भाजप, शिवसेनेची मते विभागली असली तरी शिवसेनेलाच मतदारांनी कौल दिल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले.
या मतदारसंघात २५ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. उमेदवारांनी संख्या वाढल्याने निवडणुकीविषयी उत्सुकता लागली होती. २ लाख ८५ हजार मतदारांपैकी १ लाख ९0 हजार ४२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
या मतदारसंघामध्ये २८७ मतदान केंद्र असून, त्यापैकी ८८ मतदान केंद्र ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागात ७८ हजार ९0९ मतदार आहेत. त्यापैकी ६१ हजार १४३ एवढय़ा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ग्रामीण भागामध्ये ७७ टक्के मतदान झाले. उमेदवारांच्या शहरी आणि ग्रामीण मतांचा विचार करता डा.ॅ. राहुल पाटील यांना ग्रामीण भागातून ५४टक्के मते मिळाली आहेत. तर शहरी भागात त्यांच्या मतांची टक्केवारी २९ एवढी आहे. त्यामुळे राहुल पाटील यांच्या विजयात ग्रामीण मतदारांचा मोठा वाटा आहे. या उलट या निवडणुकीत दुसर्या क्रमांकावर राहिलेले एमआयएमचे सज्जू लाला यांना शहरी भागातून सर्वाधिक ३३ टक्के मते मिळाली आहेत. तर ग्रामीण भागात केवळ ३टक्के मते मिळाली. त्यामुळे ग्रामीण मतदारांच्या बळावरच परभणीत शिवसेनेचा विजय साकार झाला व पुन्हा एकदा परभणी विधानसभा शिवसेनेचा गड असल्याचे मतदारांनी दाखवून दिले. /(प्रतिनिधी) सोनपेठ : तालुक्यात अपक्ष उमेदवार मोहन फड यांना आघाडी मिळाली. त्यांनी केलेल्या कामांची दखल व नकारात्मक मतदान यामुळे त्यांना फायदा झाला.
सोनपेठ तालुक्यात फड यांनी १२ हजार ८५१ मते मिळवून आघाडी घेतली. शिवसेनेच्या मीराताई रेंगे यांना चौथ्या क्रमांकाची ४ हजार ९५६ मते मिळाली. फड यांनी दोन-अडीच वर्षांत मतदार संघात नियोजनबद्धरित्या कामे केली. सार्वजनिक कामांना प्राधान्य दिल्यामुळे त्यांची कामे मतदाराच्या मनात घर करून बसली. अनेक गावांच्या पाणंद रस्त्यांच्या निर्मितीसाठी त्यांनी सहाय्य केले तर दुर्दशा झालेल्या रस्त्यांना मलमपट्टी करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. ही चर्चा मतदार संघात सर्वत्र सुरू असताना त्याचा परिणाम तालुक्यातही झाला. माजीमंत्री सुरेश वरपूडकर यांचा मतदार संघावर असलेला दांडगा जनसंपर्क हा गेल्या काही वर्षांत कमी झाला होता. त्यामुळे त्यांनी अस्तित्वाची लढाई केली. तालुक्यातून त्यांना १0 हजार ७८0 ही दुसर्या क्रमांकाची मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजानी दुर्राणी यांना उमेदवारी मिळाल्यानंतर मतदार संघात मतदारांशी संवाद करण्यासाठी कमी कालावधी मिळाला. तरीही त्यांनी ९ हजार ६८६ मते मिळविली. मीराताई रेंगे यांना मात्र या निवडणुकीत मतदारांची सहानुभूती नव्हती. मागच्या निवडणुकीत विजय मिळविल्याने त्यांना प्रतिनिधीत्व मिळाले. यावेळी ४ हजार ९५६ एवढी मते मिळवून त्या चौथ्या क्रमांकावर राहिल्या. शहरातही मोहन फड यांनी २ हजार ३४८ मते घेऊन आघाडी मिळविली. तर सुरेश वरपूडकर यांनी २ हजार ४४ मते घेऊन दुसर्या क्रमांकाची मते मिळविली. मागच्या निवडणुकीत बाबाजानी दुर्राणी यांना शहरात आघाडी होती. विजयी झालेल्या फड यांची मतदार यंत्रणाही समाजातील गोरगरीब जनतेवर अवलंबून होती. अनेकांनी मोठय़ा अपेक्षेने फड यांचे काम केले. शहरातून त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली.
■ या विधानसभा निवडणुकीत प्रथमच भाजपाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होता. देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट आहे किंवा नाही यावर बरीच चर्चा निवडणूक काळात झाली. राज्यात भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी या विधानसभा मतदारसंघात मात्र भाजपला ग्रामीण भागातून २६टक्के तर शहरी भागातून १९ टक्के मतदान मिळाले आहे. त्यावरून या मतदारसंघात मोदी लाटेचा आसर झाला नसल्याचे दिसून येते.