परभणी : कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी मागील तीन दिवसांपासून पोलीस प्रशासनाने कडक धोरण राबवले असून, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी करण्याबरोबरच नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला आहे. गेल्या तीन दिवसात ५ लाख ३४ हजार ८२६ रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे.
संचारबंदीचे आदेश असतानाही नागरिक या आदेशाचे उल्लंघन करत बिनधास्तपणे शहरात फिरत आहेत. त्यातून सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत असून, संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने मागील तीन दिवसांपासून नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा धडाका लावला आहे.
१७ मेपासून या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. परभणी शहरासह जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही मोहीम राबवली जात आहे. रस्त्याने विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारांच्या दुचाकी जप्त करणे, गर्दीच्या ठिकाणी प्रत्येक नागरिकाची आरटीपीसीआर तपासणी करणे यासह जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांकडूनही दंड वसूल केला जात आहे. मागील तीन दिवसात पोलीस प्रशासनाने विनामास्क फिरणाऱ्या १ हजार ५०९ नागरिकांकडून २ लाख ८२ हजार ७८ रुपये दंड वसूल केला तसेच परवानगी नसतानाही दुकान सुरू ठेवणाऱ्या १५६ दुकानदारांकडून २ लाख ४० हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याचकाळात ५९० दुचाकी जप्त करून पोलीस ठाण्यात लावण्यात आल्या. तीन दिवसात ५ लाख ३४ हजार ८२६ रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे.
१२ हजार नागरिकांचे घेतले स्वॅब
नियम मोडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली. त्यात तीन दिवसांमध्ये १२ हजार ४८ नागरिकांच्या आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. १७ मे रोजी २ हजार २७८, १८ मे रोजी ४ हजार ५७८ आणि १९ मे रोजी ५ हजार १९२ नागरिकांचे स्वॅब नमुने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने तपासणीसाठी घेण्यात आले.