कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण जिल्ह्यात घटले आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. ९ जून रोजी आरोग्य विभागाला ३ हजार २९१ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या १ हजार ९७९ अहवालात २३ आणि रॅपिड टेस्टच्या १ हजार ३१२ अहवालात ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. एकूण ३ हजार २९१ अहवालांमध्ये ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. येथील आयटीआय रुग्णालयात मंगळवारी एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५० हजार ३१४ झाली असून, ४८ हजार १०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १ हजार २५४ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला. सध्या ९५४ रुग्ण उपचार घेत आहेत. मंगळवारी दिवसभरात ६७ रुग्णांना कोरोनाची लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
एक दिवस उशिराने घेतली मृत्यूची नोंद
जिल्ह्यात ८ जून रोजी ४ रुग्णांचा मृत्यू झाला असताना आरोग्य विभागाच्या प्रेसनोटमध्ये मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे दर्शविण्यात आले होते. सोमवारी मृत्यू पावलेल्या ४ रुग्णांची नोंद मंगळवारच्या प्रेसनोटमध्ये घेण्यात आली असून, तसा उल्लेखही करण्यात आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचा गलथानपणा पुन्हा एकदा सापडला आहे.