सोनपेठ तालुक्यात दरवर्षी कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. यावर्षीही तालुक्यात १७ हजार ४८ हेक्टरवर कापसाचा पेरा करण्यात आला आहे. शासनाने कापसाचा ५ हजार ८०० रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती व सीसीआय, फेडरेशनकडून तालुक्यात कापसाच्या खरेदीसाठी ३ जिनिंगमध्ये खरेदी करण्यात येत आहे. तालुक्यात ९ हजार ३०० शेतकऱ्यांनी कापसाची ऑनलाइन नोंदणी केलेली आहे. नोंदणी केलेल्या सर्वच शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आला आहे. परंतु आतापर्यंत केवळ पणन महासंघाकडे ६२० शेतकऱ्यांनी २० हजार क्विंटल व सीसीआयचा खरेदी केंद्रावर १ हजार ६६८ शेतकऱ्यांनी ५० हजार २६८ क्विंटल असा एकूण २ हजार २२८ शेतकऱ्यांनी ७० हजार २६८ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. अद्यापही ऑनलाइन नोंदणी केलेल्या ७ हजार शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणलेला नाही. त्यामुळे ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्याने ५ फेब्रुवारीपर्यंत करम येथील सालासर जिनिंग येथे कापूस विक्रीस आणण्याचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे. त्या शेतकऱ्यांनी ५ फेब्रुवारीपर्यंत करम येथील सालासर जिनिंग येथे कापूस विक्रीस आणावा. त्यानंतर ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची कोणतीही तक्रार ग्राह्य धरले जाणार नाही.
राजेश विटेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती.