लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सध्या बाजारपेठेत साखरेपेक्षा गुळाचा भाव अधिक असल्याने अनेकांची साखर खरेदीला पसंती आहे. मात्र मागील काही महिन्यांमध्ये साखरेचे दर कमी-जास्त होत असले तरी गुळाचा भाव मात्र तेजीत आहे.
दररोजच्या वापरामध्ये साखर आणि गूळ हे जीवनाश्यक बनले आहेत. चहा यासह विविध पेय आणि खाद्यपदार्थ बनविताना साखरेचा वापर अधिक होतो. तर काही खाद्यपदार्थ हे गुळापासून बनविले जातात. नागरिकांची पसंदी साखरेला असली तरी गुळाचा वापर गेल्या काही वर्षांमध्ये वाढला आहे. गूळ नैसर्गिकरीत्या बनवला जातो. त्यामुळे त्याच्यापासून असणारे आरोग्याचे फायदे लक्षात घेता नागरिक गुळाचा वापर करण्यास पसंती देत आहे; परंतु, सद्य:स्थितीत गुळाचे दर हे साखरेपेक्षा जास्त असल्याने नागरिक साखर खरेदी करण्यास पसंदी देत आहेत.
पूर्वीच्या काळी घरोघरी गुळाचा चहा बनवला जायचा तसेच अन्य खाद्यपदार्थांत गुळाचा वापर होत होता. मात्र कालांतराने शहरासह ग्रामीण भागातही साखरेला पसंदी दिली जात आहे. मागील वर्षभरात साखरेचे दर कमी-जास्त झाले आहेत; परंतु, गुळाचे दर मात्र तेजीत असल्याचे दिसून येते.
गुळाचा चहा बनले स्टेटस
पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात घरोघरी चहा, पुरणपोळीही गुळाचीच बनविली जात असे. यामध्ये साखरेचा कमी वापर केला जात होता.
आता काही प्रमाणात ग्रामीण भागामध्येही गुळापेक्षा साखरेला महत्त्व दिले जात आहे; परंतु ग्रामीण भागातील गुळाच्या चहाची क्रेझ शहरी भागात आली आहे.
शहरातील विविध चहा विक्रीच्या स्टॉलवर गुळाचा चहा बनविला जात आहे. गुळाच्या चहामुळे अनेकांनी साखरेचा चहा घेणे बंद केले आहे.
सद्य:स्थितीत परभणी शहरात गुळाचा चहा बनविणारे अनेक स्टॉल सुरू झाले आहेत. तर ग्रामीण भागात साखरेचा चहाला पसंती आहे.