परभणी : येथील वीज वितरण कंपनीच्या वतीने थकीत वीज बिल वसुलीसाठी मागील १५ दिवसांपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील १०४ गावांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांचा दळणवळणासह पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन खंडित वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
येथील वीज वितरण कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील घरगुती, कृषी, औद्योगिक, वाणिज्य यासह इतर वर्गवारीतील जवळपास अडीच लाखांहून अधिक वीज ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. या ग्राहकांना महिन्याकाठी महावितरणच्या वतीने वीज बिल दिले जाते. मात्र, मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे बिले थकली आहेत. त्यामुळे वीज वितरण कंपनीला गावठाणसह कृषी पंपाच्या वीज समस्या सोडविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. वरिष्ठ स्तरावरूनही वीज समस्या सोडविण्यासाठी लागणारे साहित्य देताना वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. त्यामुळे मागील १५ दिवसांपासून येथील वीज वितरण कंपनीच्या वतीने बिलांच्या थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील १० उपविभागांतर्गत येणाऱ्या १०४ गावांतील वीज पुरवठा खंडित केला आहे. या गावातील वीज ग्राहकांकडून १७ कोटी ११ लाखांची थकबाकी वसुली करण्याचे आव्हान महावितरणसमोर आहे.
दळणवळणासह पाण्याचा प्रश्न ऐरणीवर
जिल्ह्यातील १०४ गावांतील वीज पुरवठा मागील आठवडाभरापासून वीज वितरण कंपनीने खंडित केला आहे. त्यामुळे नांदापूर, जलालपूर, डिग्रस, मांडवा, कुंभारी यासह गावात दळणवळणासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने खंडित केलेला वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.
...तरच वीज पुरवठा सुरळीत
वीज ग्राहकांकडे असलेली थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ग्राहकांनी एका टप्प्यात रक्कम न भरता त्या रकमेचे दोन ते चार टप्पे करून वीज बिल भरावे तरच वीज पुरवठा सुरळीत केला जाईल, अशी माहिती वीज वितरण कंपनीचे अभियंता जमदाडे यांनी दिली.