‘स्वच्छ इंधन, बेहतर जीवन’ असा नारा देत केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत देशातील दारिद्र्यरेषेखालील महिलांना मोफत घरगुती एल.पी.जी. गॅस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. १ मे २०१६ रोजी ही योजना देशात सुरू केली होती. ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक करताना धुरामुळे महिलांच्या डोळ्यांवर व शरीरावर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी ही योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात १ लाख १ हजार ५७२ लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना मोफत गॅसजोडणी देण्यात आली असली तरी दरमहा रोख रक्कम देऊन गॅस सिलिंडर खरेदी करावे लागते. गेल्या काही महिन्यांत गॅस सिलिंडरचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक महिला लाभार्थ्यांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा चुलीकडे वळविला आहे.
लाभार्थ्यांची सगळी कमाई गॅसवरच
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत लाभ घेणारे लाभार्थी हे दारिद्र्यरेषेखालील आहेत. दररोज मोलमजुरी करून ते आपली उपजीविका भागवितात. पूर्वी रोख रक्कम देऊन गॅस सिलिंडर घेतल्यानंतर त्यांना १८८ रुपयांपर्यंत सबसिडी मिळत होती. लॉकडाऊनच्या काळात तर सर्वच रक्कम सबसिडीच्या माध्यमातून परत मिळत होती. आता सबसिडी नगण्य मिळत आहे. शिवाय गॅसच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने मजुरीतून कमावलेली रक्कम गॅसवरच खर्च होत आहे. त्यामुळे महिलांनी पारंपरिक पद्धतीने चुलीवर स्वयंपाक करणे सुरू केले आहे.
गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आता नियमित गॅसवर स्वयंपाक करणे परवडत नाही. मागील आठवड्यातच कुपटा येथील दुकानातून ८६० रुपयांना गॅस भरून आणला आहे. आम्ही पाहुणे आल्यानंतरच प्रामुख्याने गॅसवर स्वयंपाक करतो. अन्यथा या महागाईमुळे चुलीवरच स्वयंपाक करावा लागतो.
- मुक्ता हारके, कुपटा
उज्ज्वला योजनेतून सिलिंडर मिळाले; परंतु दिवसेंदिवस गॅसचे भाव वाढत आहेत. यापूर्वी गॅसची सबसिडी २०० रुपयांपर्यंत येत होती. आता ते कोपऱ्यात ठेवण्याची वेळ आली आहे. चुलीवर स्वयंपाक करावा लागतो. त्यामुळे जळणासाठी नेहमीच बाहेर जावे लागते. गॅसचे दर कमी होण्याची गरज आहे.
- लक्ष्मीबाई मस्क, खपाट पिंपरी
गॅसचे भाव वाढत असल्याने आता मोफत मिळालेला गॅसही जड वाटत आहे. काही दिवस उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलिंडर घेतला. आता मोठ्या प्रमाणात भाव वाढले आहेत. सिलिंडरसाठीची रक्कम आणायची कुठून असा आम्हा गरिबांपुढचा प्रश्न आहे. त्यामुळे चुलीवरच स्वयंपाक करावा लागत आहे.
- आश्राबाई सुरवसे, सोनपेठ