लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने सुटकेचा नि:श्वास सोडत असतानाच आता जिल्ह्यात तीन रुग्णांना म्युकरमायकोसिस या गंभीर आजाराची लक्षणे आढळली असून, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरा झाल्यास किंवा रुग्णावर उपचार सुरू असताना या रुग्णांना म्युकरमायकोसिस हा आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातही अशा आजाराच्या रुग्णांची नोंद झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. येथील जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयांमध्ये ३ रुग्णांना म्युकरमायकोसिस या आजाराची लक्षणे आढळली असून, त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील खासगी दवाखान्यांमध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणे असलेले ५ ते ६ रुग्ण उपचारासाठी आले होते. यापैकी काही रुग्णांवर प्राथमिक उपचार करून त्यांना मुंबई, औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी पाठविल्याची माहिती खासगी डॉक्टरांनी दिली. त्यामुळे आता म्युकरमायकोसिस या आजाराबद्दल भीती व्यक्त केली जात आहे.
काय आहे म्युकरमायकोसिस
म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार आहे. रुग्णाची प्रतिकारक्षमता कमी झाल्यानंतर शरिरात असलेली बुरशी वेगाने वाढते आणि एकेक अवयव निकामी करते. नाक आणि डोळ्यांवर या आजारात परिणाम होताे. तसेच आजार वाढल्यानंतर तो मेंदूपर्यंतही पोहोचतो.
आजाराची लक्षणे
म्युकरमायकोसिस आजारात नाकातून रक्त येते, दात दुखतात, डोकेदुखी, श्वास घेताना त्रास होतो, हिरड्या, डोळ्यांना त्रास जाणवतो. डोळ्याखाली काळे व्रण पडतात.
तज्ज्ञांचे पथक स्थापन करण्याची गरज
म्युकरमायकोसिस हा गंभीर स्वरूपाचा बुरशीजन्य आजार आहे. या आजारात डोळे आणि नाकाला इन्फेक्शन होते. इन्फेक्शन अतिवेगाने वाढून रुग्ण दगावण्याची भीती अधिक असते. त्यामुळे अशा रुग्णांवर तातडीने उपचाराची गरज असते. विशेष म्हणजे शरिरातील वेगवेगळ्या अवयवांना बाधा पोहोचत असल्याने उपचारासाठी विविध प्रकारच्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. तेव्हा या आजाराचे निदान करून त्वरित उपचार करण्यासाठी तज्ज्ञांचे एक पथक स्थापन करण्याची गरज आहे. या पथकामध्ये कान, नाक, घसा तज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ आणि इतर तज्ज्ञांचा समावेश करावा लागणार आहे.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी
कोरोनाची लागण झाल्यानंतर तिसऱ्या व चौथ्या आठवड्यामध्ये नाक नॉर्मल सलाईनने स्वच्छ करावे. रक्तातील साखरेचे प्रमाण १५ व्या व २२ व्या दिवशी तपासून पाहावे. ज्या रुग्णांना कोविडच्या उपचारांमध्ये तोसिलिझुमाब, रेमडेसिविर हे इंजेक्शन दिले आहे तसेच ज्यांना पाच दिवसांपेक्षा जास्त ऑक्सिजन दिला आहे किंवा स्टेरॉईडचे इंजेक्शन, गोळ्या दिल्या आहेत, ज्यांची शुगर कंट्रोल नाही, अशा सर्व रुग्णांनी नाकामध्ये बुरशीची लागण झाली आहे की नाही, हे पाहण्यासाठी नाकातील स्वॅब १५ व्या व २२ व्या दिवशी तपासून घ्यावा. ज्या रुग्णांना या आजाराची प्राथमिक लक्षणे जाणवतात, त्यांनी वेळ वाया न घालवता जवळच्या फिजिशियन, डोळ्याचे डॉक्टर व नाकाच्या डॉक्टरांना भेटून त्यांच्या सल्ल्याप्रमाणे पुढील औषधोपचार करावा. अशा पद्धतीने अवलंब केल्यास कोरोनाला हरवल्यानंतर या बुरशीच्या आजारावरही मात करता येईल, असे कान-नाक-घसा तज्ज्ञ तेजस तांबोळी यांनी सांगितले.