लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील सीटीस्कॅन, एक्स-रे, सोनोग्राफी मशीन बंद अवस्थेत आहे. तर औषधींचाही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या रुग्णालयातील रुग्णांची हेळसांड अनेक दिवसांपासून सुरुच आहे.जिल्ह्यातील रुग्णांच्या उपचारासाठी आरोग्य विभागाने ग्रामीणस्तरापासून ते जिल्ह्यापर्यंत टप्प्याटप्याने रुग्णालयांची निर्मिती केली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील रुग्णांना नि:शुल्क व वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. तर शहरी भागातील रुग्णांसाठी त्या त्या शहरात आरोग्य उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय उभारले आहेत. तर जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालय जिल्ह्यातील रुग्णांना वेळेवर व तत्पर सेवा देण्यासाठी उभारण्यात आले आहे. या यंत्रणेमुळे प्रत्येक रुग्णाला जवळच्याच रुग्णालयात उपचार घेण्यासाठी सुलभ झाले आहे. परभणीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येतात. दोन वर्षांपुर्वी या रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीनची वापराची मुदत संपल्याने या मशीनला नांदेड जिल्ह्यात हलविण्यात आले आहे. या जागी अद्यापही दुसरी मशीन उपलब्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे दोन वर्षापासून रुग्णांना स्वत:च्या आर्थिक खर्चातून सीटी स्कॅन करावे लागत आहे. तर सोनोग्राफी मशीन चालविण्यासाठी मशीन चालक तज्ञ मिळत नाही. त्यामुळे सोनोग्राफी मशीनही बंद आहे. त्याच बरोबर जी एक्स- रे मशीन आहे, ती डिजीटल नसल्यामुळे रुग्णांचे आजाराचे निरसण वेळेवर होत नाही. गेल्या काही दिवसांपासून औषधींचा तुटवडाही निर्माण झाला आहे. जवळपास ८३ लाख रुपयांच्या औषधींच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. या निविदेतील औषधी रुग्णालयाला मिळेपर्यंत रुग्णांना औषधी बाहेरुनच खरेदी करावी लागणार आहेत. एकंदरीत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सुविधेऐवजी गैरसोयीलाच सामोरे जावे लागत आहे. याकडे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.जावेद अथर यांनी लक्ष देऊन जिल्हा सामान्य रुग्णालयाची विस्कटलेली घडी बसवावी, अशी मागणी रुग्णांतून होत आहे.दोन वर्षानंतर झाले मॅगो ४ मशीनचे इन्स्टॉलेशनजिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रुग्णांना अद्ययावत सुविधा मिळावी, यासाठी जवळपास एक ते दीड कोटी रुपये खर्च करुन मॅगो ४ मशीन मागविण्यात आली; परंतु, या मशीनला लागणारे साहित्य आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आले नाही. त्यामुळे जवळपास दोन वर्षे ही मशीन जिल्हा रक्तपेढीमध्ये धूळखात पडून होती. ‘लोकमत’ने मशीन सुरु करण्या संदर्भात पाठपुरावा केला. त्यानंतर ३० आॅगस्ट रोजी या मशीनचे इन्स्टॉलेशन करण्यासाठी औरंगाबाद येथील दोन तज्ज्ञ जिल्हा रक्तपेढीत दाखल झाले. गुरुवारपासून या मशीनचे इन्स्टॉलेशन करणे सुरु आहे. त्यामुळे येत्या ८ दिवसांत ही मशीन रुग्णांच्या सोयीसाठी उपलब्ध होणार आहे. या मशीनद्वारे एचआयव्ही तपासणी, गुप्तरोग तपासणी, कावीळ आदी रोगांचे निदान होणार आहे. त्यामुळे रुग्णांसाठी ही मशीन मोठी उपयुक्त ठरणार आहे.सोनोग्राफी मशीन चालविण्यासाठी रुग्णालयाच्या वतीने तज्ज्ञांचा शोध सुरु आहे. त्याच बरोबर सीटी स्कॅन मशीन राज्य शासनाचे मंजूर केली आहे. येत्या एक महिन्यात ही मशीन रुग्णांच्या उपचारासाठी दाखल होणार आहे. औषधींचाही सोमवारपर्यंत रुग्णालयाला पुरवठा होणार आहे.-डॉ.जावेद अथर, जिल्हा शल्यचिकित्सक, परभणी
परभणी : मशिनरी बंद; औषधींचाही तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 23:36 IST