येथील उघडा महादेव परिसरात सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कपिलनगर भागातून एकजण कोयता घेऊन दाखल झाला. या परिसरात उभ्या असलेल्या ऑटोरिक्षाच्या काचा फोडल्या तसेच दोघांवर कोयत्याने हल्लाही करण्याचा प्रयत्न केला; परंतु दोघांनीही बचाव केला. हा सर्व प्रकार घडत असताना या भागात बघ्यांचा मोठा जमाव झाला जमला होता; परंतु या व्यक्तीच्या हातात कोणता असल्याने कोणीही पुढे आले नाही. काही वेळानंतर याच भागातील उघडा महादेव मंदिराच्या पुजाऱ्यासही या व्यक्तीने धमकी दिली. ही माहिती नगरसेवक सचिन देशमुख यांना समजल्यानंतर त्यांनी येथे येऊन या व्यक्तीस पाठीमागून पकडत त्याच्या हातातील कोयता हिसकावून घेतला. नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांना ही माहिती मिळाल्यानंतर काही वेळाने पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले. या व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नगरसेवक सचिन देशमुख यांनी त्या व्यक्तीजवळ असलेला कोयता आणि जॅकेट पोलिसांकडे सुपूर्द केले. दरम्यान, हा व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणात पुढे काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.
उघडा महादेव भागात कोयता घेऊन दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:22 IST