परभणी : बंद पडलेले मोबाइल सुरू करण्यासाठी एक ॲप डाउनलोड करून १० रुपयांचे रिचार्ज करताच खात्यातील ४९ हजार रुपये परस्पर लांबवत येथील माजी खा. तुकाराम रेंगे यांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना ९ फेब्रुवारी रोजी घडली आहे. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
येथील माजी खा. तुकाराम रेंगे यांचे दोन्ही मोबाइल मंगळवारी अचानक ब्लॉक झाले. त्यामुळे मोबाइल रिचार्ज करण्यासाठी तुकाराम रेंगे यांनी सोपान फाळके यांना जिओ कंपनीच्या कार्यालयात पाठविले होते. त्याच वेळी अज्ञात व्यक्तीने मोबाइलवर फोन करून ब्लॉक झालेले सीमकार्ड लगेच सुरू करण्यासाठी केवळ १० रुपयांचे रिचार्ज करावे लागेल, असे सांगितले. त्यासाठी एक ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची विनंती या व्यक्तीने केली. त्यामुळे तुकाराम रेंगे यांनी सोपान फाळके यांना हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याचे सांगितले. हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यावरून १० रुपयांचे रिचार्ज करण्यासाठी त्यांनी एसबीआयच्या डेबिटकार्डचा वापर केला. तेव्हा काही वेळातच या खात्यातून ४९ हजार रुपये काढून घेतल्याचा मॅसेज मोबाइल क्रमांकावर आला. या प्रकरणात फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच माजी खा. तुकाराम रेंगे यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. त्यावरून गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.