परभणी : जमीन जिवंत ठेवून त्यातील शेतमालाचे उत्पादन वाढविण्याची गरज निर्माण झाली असून हे केवळ सेंद्रिय शेतीतून शक्य आहे. तेव्हा सेंद्रिय शेती उत्पादने वाढवावीत, असे आवाहन गाझियाबाद येथील एनसीएफचे संचालक गगनेश शर्मा यांनी केले.
नागपूर येथील क्षेत्रीय जैविक शेती केंद्र, परभणीच्या वनामकृवितील सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, हैदराबाद येथील शाश्वत शेती केंद्र आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने १५ ते २१ मार्च या काळात ऑनलाईन सेंद्रिय शेती प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी डॉ. शर्मा बोलत होते.
कुलगुरू डॉ.अशोक ढवण, डॉ.गगनेश शर्मा आणि संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात अडीचशे पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना गगनेश शर्मा म्हणाले, यशस्वी उद्योजक बनण्यासाठी सेंद्रिय शेती करणे आवश्यक आहे. शेतकरी मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक म्हणून शेती करणे आवश्यक आहे. शेती जिवंत ठेवून उत्पादन घेण्याची आवश्यकता निर्माण झाली असून, हे काम फक्त जैविक शेतीतून साध्य करता येईल, असे शर्मा म्हणाले.
जबलपूर येथील प्रादेशिक संचालक डॉ. राजपूत म्हणाले, सेंद्रिय शेतीमध्ये स्थानिक बायो डायजेस्टर तण आणि रोगजनकांच्या नियंत्रणासाठी आवश्यक आहे. कोविडच्या परिस्थितीमध्ये सेंद्रिय उत्पादन विक्रीत ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाली असून, आशिया खंडात भारताने पहिला क्रमांक मिळविला आहे. तर जगात भारत आठव्या स्थानावर आहे. वनामकृविचे सहयोगी संचालक डॉ. के. एस. बेग म्हणाले, जैविक शेतीमुळे जमिनीची उपजाऊ क्षमता वाढते. भारतात जैविक शेतीचे क्षेत्र असणाऱ्या भागात जैविक शेती २० ते ३० टक्क्यांनी वाढणे गरजेचे आहे. सेंद्रिय मालास योग्य भाव, बाजारपेठ उपलब्ध होण्याची आवश्यकताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी आयोजक डॉ. वाचस्पती पांडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. डॉ. प्रवीण कापसे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. जी. व्ही. रामानजनेयुलू यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अभिजित कदम, डॉ. सुनील जावळे, श्रीधर पतंगे, सतीश कटारे, योगेश थोरवट आदींनी प्रयत्न केले.
परप्रांतीय शेतकऱ्यांचा सहभाग
या प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, बिहार, तामिळनाडू, तेलंगना, आंध्रप्रदेश येथील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘सेंद्रिय शेतीमध्ये पेरणी, वाण, लागवड पद्धती, कीड व रोग व्यवस्थापन, सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण व सेंद्रिय मालाची प्रक्रिया आदी विषयावर नामांकित संशोधन संस्था, स्वयंसेवी संस्था, आयसीएआर संस्थांमधील तज्ज्ञांना निमंत्रित करून प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.