परभणी : तुमचे सीम ब्लाॅक होऊ शकते, त्यासाठी एक प्रोसेस करावी लागेल, असे सांगून ठरावीक ॲप डाऊनलोड करून पैशांची लूट करण्याचे प्रकार सध्या घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे.
डिजिटल व्यवहार वाढल्याने चोरीच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरल्या जात आहेत. बँकेचा मॅनेजर बोलतो, तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक होणार आहे, असा बनाव करून एटीएमची सर्व माहिती मिळवत फसवणूक केल्याच्या घटना जिल्ह्यात यापूर्वी घडल्या आहेत. त्याचप्रमाणे तुमच्या मोबाइल क्रमांकावरून तुम्ही पैसे जिंकल्याचे आमिष दाखवून जीएसटीचे पैसे भरावे लागतील, असे सांगून पैसे लाटण्याचे प्रकारही जिल्ह्यात घडले आहेत. आता तर त्याहीपेक्षा पुढे जाऊन संबंधिताच्या मोबाइलचा ॲक्सेस मिळवून त्याच्या मोबाइलवरील सर्व व्यवहाराची माहिती घेत परस्पर पैसे ट्रान्सफर करून घेण्याचे प्रकारही घडले आहेत. ‘सिम व्हेरिफिकेशन पेंडिंग’ असा मॅसेज टाकूनही फसवणुकीचे प्रकार इतर जिल्ह्यांत यापूर्वी झाले आहेत. मात्र, जिल्ह्यात अशा पद्धतीने फसवणुकीची तक्रार नाही. मोबाइलवरून होणाऱ्या फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे.
ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी सावधान
अनोळखी व्यक्तीने एखादे मोबाइल ॲप डाऊनलोड करण्यास सांगितल्यास, हे ॲप डाऊनलोड न करता काळजीपूवर्वक व्यवहार करावेत.
एटीएम, मोबाइल ब्लाॅक होण्याचा मॅसेज आल्यास सावधान
आमुक मोबाइल क्रमांकाचे बिल भरणे बाकी आहे, ते त्वरित न भरल्यास मोबाइल ब्लॉक होऊ शकतो, असा मॅसेज मोबाइलवर टाकून हा मोबाइल क्रमांक परस्पर हॅक करण्याचा प्रकार जिल्ह्यात यापूर्वी घडला आहे.
मोबाइल क्रमांक हॅक केल्यानंतर परत इतर क्रमांकावर फोन करून मोबाइल सुरू करण्यासाठी हे ॲप डाऊनलोड करून १ रुपया ट्रान्सफर करण्याचे सांगितले जाते.
या व्यवहारातून समोरील व्यक्ती मोबाइलधारकाचे बँक खाते आणि पासवर्ड हस्तगत करते. त्यानंतर खात्यावरील सर्व रक्कम लाटली जाते. परस्पर खात्यावरील रक्कम ट्रान्सफर करून घेतली जाते.
अशी घ्या काळजी
डिजिटल व्यवहार आता वाढले आहेत. प्रत्येकाच्या मोबाइलमध्येच त्याचे खाते क्रमांक, पासवर्ड जोडलेले आहेत. त्यामुळे पैसे पाठविणे, स्वीकारणे या कामासाठी आता बँकेत जाण्याची आवश्यकता भासत नाही. मात्र, असे व्यवहार करीत असताना काळजी घेण्याची गरज आहे. तुमच्या मोबाइलचा ॲक्सेस घेऊन परस्पर तिसरीच व्यक्ती व्यवहार करून खात्यातील पैसे काढून घेण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे अनोळखी व्यक्तीने सांगितलेले एनी डेक्स किंवा मोबाइलचा ॲक्सेस देणारे ॲप डाऊनलोड करू नये. त्याचा पासवर्डही संबंधितास देऊ नये.