परभणी : आरटीपीसीआरच्या तपासण्यांचे अहवाल रुग्णांना वेळेत प्राप्त व्हावेत, यासाठी आता गंगाखेड येथेही मिनी प्रयोगशाळा उभारली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांना शोधण्यासाठी आरोग्य विभागाकडून नागरिकांच्या आरटीपीसीआर तपासण्या केल्या जात आहेत; परंतु त्याचे अहवाल नागरिकांना वेळेत मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. हे अहवाल दुसऱ्याच दिवशी नागरिकांना मिळावेत, असे आदेश पालकमंत्री नवाब मलिक यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, आरटीपीसीआरच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात एक प्रयोगशाळा आहे. या ठिकाणी आणखी एक प्रयोगशाळा वाढविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे एका खाजगी प्रयोगशाळेलाही मंजुरी दिली आहे. त्यामुळे दररोज किमान सात हजार तपासण्या करण्याची क्षमता सद्य:स्थितीला उपलब्ध आहे; परंतु असे असतानाही नातेवाइकांना आरटीपीसीआरचे अहवाल वेळेत प्राप्त होत नाहीत. त्यामुळे संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. ही बाब पालकमंत्री मलिक यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर नागरिकांना २४ तासांत किंवा जास्तीतजास्त ४८ तासांत त्यांचा अहवाल उपलब्ध करून द्यावा, असे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे आरटीपीसीआर तपासण्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. आणखी एक प्रयोगशाळा गंगाखेड येथे मंजूर करण्यात आली असून, लवकरच या ठिकाणी प्रयोगशाळेची उभारणी केली जाणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली.
व्हेंटिलेटर खरेदीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना
जिल्ह्यात व्हेंटिलेटरचा सध्या तुटवडा नाही; परंतु रुग्णसंख्या वाढल्यानंतर लागणारे व्हेंटिलेटर खरेदीचे अधिकार जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. आवश्यक त्या सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात येणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.